माझ्या मुलाचे लग्न देखील सामूहिक विवाह सोहळ्यात – नाना पाटेकर


भाईश्री परिवार आणि नाम फाउंडेशन यांच्यावतीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात बोलताना प्रसिद्ध सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी समाजासाठी जेवढे जमेल तेवढे करा आणि ते केल्यानंतर केलेले काम विसरून जा. दुसऱ्या कामाला लागा मात्र केलेल्या कामाचा तमाशा करू नका, असे आवाहन केले.

अभिनेता मकरंद अनासपुरे, हरि भक्त परायण शेष महाराज गोंदिकर, भाईश्री परिवाराचे रमेश भाई पटेल, भावेश पटेल, आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. नाना यांनी उपस्थितांना आवाहन करतानाच कानमंत्रही दिले. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणे म्हणजे आपण काही कोणावर उपकार करत नाहीत, आपल्याकडे जी गोष्ट आहे आणि समोरच्याकडे नाही ही त्याला देणे ही आपली जबाबदारीच आहे आणि ती करतच राहिली पाहिजे असे सांगून मला मुलगी नाही. पण आज या मुलींचे कन्यादान करताना मला आनंद होत असल्याचेही नाना म्हणाले. दरम्यान, मी माझा मुलगा मल्हार याचाही लग्न सामूहिक सोहळ्यामध्येच करण्याचा प्रयत्न करील असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले.

थोडक्यात प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या खास मिस्कील भाषेमध्ये त्यांनी नवरदेवाचा समाचार घेताना उपस्थितांमध्ये हास्य पिकवले. पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 48 विवाह सोहळे पार पडले. प्रत्येक जोडप्याला गृह उपयोगी साहित्य देण्यात आले. तसेच प्रत्येक जोडप्याचे पालकत्व ही समाजातील दानशूर व्यक्तींनी घेतले होते.

Leave a Comment