गुगलने लाँच केला पिक्सेल 3a आणि पिक्सेल 3aएक्सएल


आपल्या पिक्सल मालिकेतील ३ ए आणि ३ ए एक्सएल हे दोन नवे स्मार्टफोन्स गुगलने लाँच केले आहेत. पिक्सल मालिकेतील तिसर्‍या पिढीतील हे मॉडेल्स आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीने कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेल्या गुगलच्या वार्षिक इव्हेंटमध्ये (Google I/O 2019) लाँच केले. गुगलचा ७ मे पासून सुरू झालेला हा इव्हेंट ९ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर हे दोन्ही मॉडेल्स चालणारे असून लवकरच याला क्यू या आवृत्तीचे अपडेट मिळणार आहे. हे मॉडेल्स भारतातही लाँच करण्यात आले असून यासाठी नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ३९,९९९ आणि ४४,९९९ रूपये आहे. याची रॅम ४ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी आहे.

हे मॉडेल्स ग्राहकांना प्रत्यक्षात १५ मे पासून खरेदी करता येणार आहेत. या दोन्ही मॉडेल्समधील बहुतांश फिचर्स विशेषतः हार्डवेअर एकसारखे असून फरक हा आकारमान व बॅटरीत आहे. पिक्सल ३ ए मॉडेलमध्ये ३,००० तर ३ ए एक्सएलमध्ये ३७०० मिलीअँपिअर क्षमतांच्या बॅटरीज असून दोन्हीमध्ये फास्ट चार्जींगचा सपोर्ट आहे. बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ३० तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याशिवाय केवळ १५ मिनिट चार्ज केल्यास तब्बल ७ तास बॅकअप मिळू शकते असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.

Leave a Comment