भेंडवळचे भाकीत; देशाला करावा लागणार आर्थिक संकटासह नैसर्गिक संकटांचाही सामना


बुलडाणा – 300 वर्षाचा इतिहास बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीला असून राज्यभरात सुप्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे येथील पुंजाजी महाराजांनी अक्षय तृतीयेच्या सायंकाळी मांडणी केली होती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर परंपरेनुसार या घटनांचे भाकीत वर्तवण्यात आले.

देशाला आर्थिक संकटासह नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागणार असल्याचे यात भाकीत वर्तवण्यात आले आहे. पावसाचा अंदाज सर्वसाधारण राहणार असून पीकही साधारण राहणार आहे. देशाचा पंतप्रधान कायम राहणार असून अडचणींचा सामना त्यांना करावा लागणार असल्याचे भाकीतही या घटमांडणीतून करण्यात आले.

पुंजाजी महाराज यांनी घटात ठेवण्यात आलेल्या विविध धान्याच्या राशींवरून भाकीत वर्तवले. देशावर होणारे दहशतवादी हल्ले कमी होणार नाहीत. मात्र दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी देशाचे संरक्षण खाते सक्षम राहील, असे भाकीतही घटमांडणीतून वर्तवण्यात आले आहे.

यावर्षी पावसाळा साधारण राहणार असल्यामुळे पीकही साधारण असतील असेही पुंजाजी महाराज यांनी यावेळी भाकीत वर्तवले. ज्वारीचे पीक सर्वसाधारण राहणार असून चांगला भाव मिळणार आहे. तुरीच्या भावात तेजी असणार आहे. मूग, उडीद आणि तीळ मोघम असल्याने पीक जेमतेम राहील. बाजरीच्या पिकाचे उत्पन्न चांगले तसेच भावात तेजी असणार आहे. तांदळाचे पीक मोघम असणार आहे. जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभऱ्याचे पीकही सर्वसाधारण राहील.

पावसाळ्याचा पहिला महिना जेमतेम राहील, दुसरा महिना चांगला, तिसरा महिना जेमतेम राहणार आहे. यात अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे. नैसर्गिक आपत्तीचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यासह समुद्र किनारपट्टी भागात आपत्तीचे संकेत देण्यात आले आहेत. जनावरांना चाराटंचाई भासणार आहे. तर नागरिकांना आर्थिक चणचण भासणार असल्याचेही या घटमांडणीतून वर्तवण्यात आले आहे.

Leave a Comment