या गावात गॉसिपिंगवर बंदी, दंड, शिक्षेची तरतूद


माणूसप्राणी गप्पा मारल्याशिवाय जगू शकणार नाही हे सर्वाना मान्य होईल. फिलिपिन्सची राजधानी मनिला पासून २०० किमीवर असलेल्या बिनालोलान या गावाच्या महापौरांना मात्र तासनतास गप्पा मारण्यामुळे गुन्हेगारी वाढते असे वाटते. यामुळे त्यांनी गावात गॉसिपिंग म्हणजे गप्पा, त्यातही कानचुगल्या करण्यावर बंदी घातली आहे. तिचा भंग करणाऱ्याला ७२५ रुपये दंड आणि तीन तास राष्ट्यावरचा कचरा साफ करणे अश्या शिक्षेची तरतूद केली आहे. १ मे पासून ही बंदी लागू झाली असून बिनालोलान बरोबर अन्य सात गावात सुद्धा अशी बंदी घातली गेली आहे.


महापौर रेमन गुईको यांच्या म्हणण्याप्रमाणे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात अश्या गप्पातून अफवा पसरण्याचे प्रमाण अधिक असते व यामुळे मारहाण, हत्या अश्या प्रकारचे अपराध वाढतात. रात्री १० नंतर मात्र ही बंदी शिथिल केली जाते कारण त्यावेळी लोक घरात असतात. रेमन याच्या निरीक्षणानुसार गावातील लोक झाडाखाली बसून कुणाची लफडी, पैसे, संपत्ती विवाद, रिलेशन अश्या विषयांवर गप्पा झोडतात आणि वेळ घालवितात. यावर बंदी घालून या लोकांना त्यांचे आयुष्य सुधारण्याची एक संधी आम्ही दिली आहे. लोकांनी ही बंदी गंभीरपणे घ्यावी म्हणून दंड व शिक्षेची तरतूद आहे.

एखादी व्यक्ती गॉसिपिंग करताना प्रथम सापडली तर तिला ७२५ रु. दंड व तीन तास रस्त्यातील कचरा साफ करावा लागेल पण दुसऱ्यांदा हाच गुन्हा करताना कुणी सापडले तर त्याला १३५० रुपये दंड आणि ८ तास रस्त्याची साफसफाई करावी लागणार आहे. नवीन कायद्यामुळे वादविवाद कमी होतील व त्यामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल असा त्यांचा दावा आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात झालेल्या संशोधनामध्ये दिवसात लोक सरासरी ५२ मिनिटे गप्पा छाटण्यात घालवितात. विशेष म्हणजे कमी पैसे मिळविणाऱ्याच्या तुलनेत अधिक पैसे मिळविणारे जादा गप्पा मारतात. म्हातार्या व्यक्तीच्या तुलनेत तरुण वर्ग जास्त गॉसिपिंग करतो आणि त्यात चुगल्या करण्याचे प्रमाण जास्त आहे.

Leave a Comment