बिटकॉइनची गगनभरारी, भाव ६ हजार डॉलर्सवर


जगभरातील अनेक देशांनी क्रीप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलनावर बंदी घालण्यासाठी उपाययोजना सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर जगातील पहिले आभासी चलन ठरलेल्या बिटकॉइनने गगनभरारी घेतली असून त्याचा भाव एका बिटकॉइन साठी चक्क ६ हजार डॉलर्सवर पोहोचला आहे. ब्लुमबर्ग कंपोझीट प्रायसिंग नुसार नोव्हेंबर नंतर प्रथमच २०१९ मध्ये बिटकॉइनच्या भावाने उच्च पातळी गाठली आहे. लंडन मध्ये त्याचा भाव ५९६१ डॉलर्सवर आहे तर माल्टा बेस्ड बायनान्स बिटकॉइन शेअर ६०२८ डॉलर्सवर गेला आहे.

जगात आज अनेक क्रीप्टोकरन्सी आहेत मात्र त्यात सर्वाधिक पसंती बिटकॉइनला आहे. तांत्रिक गुंतवणूक आणि पारंपारिक गुंतवणूक फर्मसाठी बिटकॉइन नेहमीच आकर्षक गुंतवणूक ठरली आहे. गेल्या वर्षात अनेक सरकारे क्रीप्टोकरन्सीवर बंदीची भाषा बोलत असताना सुमारे ७० टक्क्याने घसरण झालेले बिटकॉइन पुन्हा वेगाने चढत आहे. फिडेलिटी इन्वेस्टमेंटने या वर्षाच्या सुरवातीला बिटकॉइन स्टोअर करण्यासाठी एक सेवा सुरु केली आहे. काही आठवड्यात संस्थागत ग्राहकांना खरेदी विक्रीसाठी काय योजना आहे याची माहिती दिली जाणार आहे. सध्या एका बिटकॉइन ची भारतीय रुपयातील किंमत ४,०८,९०६. ६० अशी आहे.

३ जानेवारी २००९ साली बिटकॉइनची सुरवात झाली असे मानले जाते. सध्या जगात १ कोटी पेक्षा अधिक बिटकॉइन आहेत. आभासी मुद्रा, डिजिटल करन्सी या नावाने ती ओळखली जाते. एप्रिल २०१९ मध्ये बिटकॉइनची किंमत ३५०० डॉलर्स होती ती एप्रिल अखेरी ५ हजार व आता ६ हजार डॉलर्सवर गेली आहे. बिटकॉइनचा क्रीप्टोकरन्सी मधील शेअर ५६ टक्के इतका आहे. विशेष म्हणजे या करन्सीवर कोणतेही मध्यवर्ती नियंत्रण नाही. ही स्वतंत्र करन्सी असून तिचे अस्तीत्व इलेक्ट्रोनिक स्वरुपात आहे.

Leave a Comment