तेज बहादुर यादव यांची सर्वोच्च न्यायालयात धाव


लखनौ – बीएसएफचे बडतर्फ जवान आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार तेज बहादुर यादव यांनी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात ते निवडणूक लढणार होते. पण त्यांनी मुदतपूर्व बीएसएफने बडतर्फ केल्याचे स्पष्टीकरण मागणारे प्रतिज्ञापत्र न दिल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.

वाराणसी येथे लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. पतंप्रधान मोदी येथून दुसऱ्यांदा रिंगणात असल्यामुळे येथील मतदान प्रक्रियेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तेज बहादुर यादव यांनी येथून सपा-बसप आघाडीच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांना बडतर्फ केल्याचे कारण स्पष्ट करणारे बीएसएफचे शपथपत्र 24 तासांच्या आत दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. ठराविक मुदतीमध्ये तेज बहादुर यादव यांनी शपथपत्र जमा न केल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. पण, या विरोधात आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. ते तेथे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात लढणार आहेत.

त्यांना आयोगाने शपथपत्र सादर करण्यासाठी कमी वेळ दिला होता, असा त्यांचा आरोप आहे. तर, भ्रष्टाचार आणि घोटाळा केल्या प्रकरणीच अशा प्रमाणपत्राची गरज असते, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा अर्ज रद्द करुन आयोगाने निवडणूक लढण्याच्या त्यांच्या हक्कावर गदा आणली असल्याचाही आरोप यादव यांनी केला आहे. ते त्यासाठीच सर्वोच्च न्यायालयात खटला चालवणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment