अमरनाथ गुहेत तयार झालेय २२ फुटी शिवलिंग


हिंदूंसाठी पवित्र मानली जाणारी अमरनाथ म्हणजे बर्फानी बाबा यात्रा यंदा १ जुलै पासून सुरु होत आहे मात्र त्यापूर्वीच यंदा अमरनाथ गुहेत बर्फाचे २२ फुटी शिवलिंग तयार झाले असल्याचा दावा केला जात असून या शिवलिंगाचा पहिला फोटो समोर आला आहे. यात या बर्फाला शिवलिंगाचा स्पष्ट आकार आला असल्याचे दिसत आहे. यंदा ही यात्रा १ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान सुरु राहणार आहे. यंदा बनलेले शिवलिंग गतवर्षीपेक्षा अधिक घट्ट असल्याचे सांगितले जात आहे.

गेली काही वर्षे अधिकृत यात्रा सुरु होण्याच्या अगोदरच काही लोक या गुहेपाशी जाऊन बर्फाचे शिवलिंग किती प्रमाणत तयार झाले आहे याचे फोटो प्रसिद्ध करत आहेत. या भागात नोव्हेंबरपासून जून पर्यंत बर्फ पडते आणि बर्फ जितके जास्त प्रमाणात पडते त्यानुसार शिवलिंग किती मोठे होणार याचा अंदाज बांधला जातो. या गुहेत पाणी कुठून टपकते याचा शोध अजूनही लागलेला नाही मात्र गुहेत शिव पार्वती आणि गणेश अशी बर्फाच्या तीन पिंडी दिसतात. याच गुहेत शिवाने पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते असा समज आहे व त्यामुळे या बर्फानी बाबाच्या दर्शनासाठी दरवर्षी अनेक अडचणी सोसून अनेक अडथळे पार करून लाखो भाविक जातात.


गेली काही वर्षे या यात्रेवर दहशद्वादाची छाया आहे. यात्रेत बरेचवेळा बॉम्बस्फोट केले गेले आहेत तर कधी दहशद्वाद्यानी हल्ले केले आहेत. मात्र तरीही भाविक येथे जातात आणि या कठीण यात्रेत सुरक्षा दलाचे जवान त्यांची सर्वतोपरी मदत करत असतात. यंदाही पाक सीमा तसेच यात्रा मार्गावर कडक सुरक्षा तैनात केली गेली आहे. पहेलगाम आणि बालताल अश्या दोन्ही मार्गाने भाविक येथे जाऊ शकतात. त्यासाठी यंदा प्रथमच भाविकांचे रजिस्ट्रेशन करताना त्या कार्ड मध्ये बारकोड (क्विक रिअॅक्शन कोड) घातला गेला आहे.


आलेल्या भाविकाचे कार्ड अधिकृत आहे वा नाही याच्या तपासणीसाठी बारकोडवर वॉटरमार्क आणि अमरनाथ श्राईन बोर्ड चा लोगो दिला गेला असून बोर्ड अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारकोडवरून यात्रेकरूची माहिती मिळणार आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली अथवा यात्रेकरू संकटात सापडला तर त्याची ओळख पटविणे शक्य होणार आहे. बोर्डाचा लोगो आणि यात्रेकरूची महत्वाची माहिती मॅग्नीफाइंग ग्लास मधूनच दिसू शकणार आहे. यंदा या यात्रेसाठी गतवर्षीप्रमाणेच भाविकांची गर्दी होईल असा अंदाज सुरु असलेल्या नोंदणीवरून केला जात आहे.

Leave a Comment