प्रिन्स हॅरी- मेगनला पुत्रलाभ


ब्रिटीश राजघराण्यात नवीन पाहुण्याचे आगमन झाले असून डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांना सोमवारी पहाटे पुत्रलाभ झाला. बाळ आणि बाळाच्या आईची तब्येत चांगली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. प्रिन्स हॅरीने मुलाच्या जन्मामुळे दोघेही खूप आनंदात असून जनतेकडून मिळत असलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद दिले आहेत. बाळाचे नाव अजून ठरलेले नाही मात्र दोन दिवसानंतर एक घोषणा करण्यात येणार असल्याचे व त्यात नवजात बाळाची एक झलक दाखविली जाणार असल्याचे प्रिन्स हॅरीने नमूद केले आहे.


नवजात बाळाची आई अमेरिकन असल्याने या बाळाला जन्माबरोबर दोन नागरिकत्व मिळाली आहेत. ब्रिटीश राजघराण्याचा तो वारस असल्याने त्याला ब्रिटनचे तसेच आई अमेरिकन असल्याने त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे. बकिंघम पॅलेस समोर या संदर्भात एक पत्रक लावले गेले असून त्यात बाळाचे वजन ३.२ किलो असल्याचे व त्याचा जन्म सोमवारी पहाटे ५.२६ मिनिटांनी झाल्याचे कळविले गेले आहे. हे बाळ ब्रिटीश महाराणीचे आठवे नातवंड आहे आणि राजघराण्याच्या वारसा यादीत सातवे आहे. त्याच्यापूर्वी राजगादीसाठी प्रिन्स ऑफ वेल्स, ड्युक ऑफ केम्ब्रिज, प्रिन्स जॉर्ज, प्रिन्सेस शार्लट, व प्रिन्स लुईस यांचा नंबर आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी बाळाच्या जन्माबद्दल प्रिन्स हॅरीचे अभिनंदन केले आहे तर मेक्सिकोत राहणाऱ्या मेगन मर्केलच्या वडिलांनी जावइ आणि लेकीचे अभिनंदन करताना हा राजकुमार मोठा होऊन राजपरिवार आणि ब्रिटनच्या नागरिकांची सेवा करेल अशी अशी भावना व्यक्त केली आहे.

Leave a Comment