देवगड मँगो बाँड खरेदी करून व्याज, मोफत आंबे मिळवा


देवगडचा प्रसिद्ध हापूस घरबसल्या थेट बागेतून तुमच्या घरात, तोही मोफत आणि शिवाय व्याजाची कमाई करून देईल अशी संधी देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. संघाने मँगो बाँड व्हर्जन टू सादर केले असून त्यात किमान ५० हजार आणि त्यापुढे ५ हजाराच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. ५० हजाराची गुंवणूक केल्यास दरवषी ५ हजार रुपयांचे आंबे घरपोच मोफत अशी पाच वर्षे मिळणार आहेत आणि शिवाय गुंतविलेल्या रकमेवर दरवर्षी १० टक्के व्याज मिळणार आहे.

सध्या रसाळ, मधुर आंब्यांचा हंगाम ऐन भरात आहे. महाराष्ट्रातील हापूस केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे आणि जगभरातील आंबा प्रेमी त्याचा स्वाद चाखण्यास उत्सुक असतात. कोकण भागातील हा फळांचा राजा आहे पण त्यातही देवगडचा हापूस महाराजा आहे. या आंब्याची ओळख जगभर आहे आणि या भागात ४५ हजार एकरात ७० गावातील १ हजार शेतकरी दरवर्षी ५० हजार टन आंब्याचे उत्पादन घेत आहेत. मात्र त्यामानाने या भागात त्याला बाजार कमी आहे. म्हणून ही बॉंड योजना आखली गेली असून आत्तापर्यंत २०० लोकांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. यात महाराष्ट्राबरोबर दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद येथील ग्राहकांचा समावेश असल्याचे संचालक ओंकार सप्रे यांनी सांगितले.


सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजित गोगटे म्हणाले देवगड हापूस ही वेगळी ओळख आहे पण आजकाल देवगड हापूसच्या नावावर कोणतेही आंबे विकले जात आहेत व त्यामुळे देवगडचे नाव खराब होत आहे. याला आळा घालण्यासाठी २०११ मध्येच बॉंड आणले गेले आता त्याचे नवे व्हर्जन आणले आहे. संस्थेने खात्रीचा आंबा ग्राहकांना मिळावा यासाठी ऑनलाईन विक्री सेवा यापूर्वी सुरु केली आहे आणि या योजनेत ७०० शेतकरी सहभागी आहेत. आमची संस्था देशातील जुनी संस्था आहे आणि ऑनलाईन विक्री करणारी पहिली संस्था आहे. यंदा ३५ शहरात ही सुविधा दिली जात आहे.

मँगो बाँड मध्ये गुंतवणूक करताना आंब्याचा जो भाव तेव्हा असेल त्याच दराने पुढची पाच वर्षे दरवर्षी ५ हजार रु. किमतीचे आंबे घरपोच दिले जाणार असल्याचे गोगटे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment