जगभरात चिकित्सा आणि तंत्रज्ञानाचे विश्व वेगळ्या उंचीवर पोहोचले असल्यामुळे येथे काहीही अशक्य नाही. एकीकडे लोकांना बोटॉक्सचे इंजेक्शन वृद्ध होऊ देत नाहीत, तर दुसरीकडे चेहऱ्यात आणि शरीरात प्लॅस्टिक सर्जरीच्या माध्यमातून बदल केला जात आहे. त्यातच सिक्स-पॅक अॅब्सची लोकांमध्ये वाढती क्रेझ पाहता, यासाठी थायलंडमधील एका हॉस्पिटलने सर्जरी सुरू केली आहे. म्हणजे जिममध्ये काही वर्षे घाम गाळण्यापेक्षा येथे सर्जरी करून तुम्हाला काही तासांमध्ये सिक्स अॅब्स मिळतील.
मास्टरपीस हॉस्पिटल असे बँकॉकच्या रुग्णालयाचे नाव आहे. या हॉस्पिटलमध्ये एक सर्जरी केली जाते. पोटावर असलेली चरबी यात दूर केली जाते, जेणेकरून सिक्स-पॅक अॅब्स दिसावेत. कोणतेही प्लॅस्टिक किंवा सिलिकॉन या सर्जरीमध्ये इम्प्लांट केले जात नाही.
याबाबत हॉस्पिटलने माहिती दिली की, इम्प्लांट आम्ही करत नाही, कारण ते चांगले दिसत नाही आणि जास्त काळासाठी ते चालत नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही ही सर्जरी करत आहोत. ज्या ठिकाणाहून आम्हाला २० ते ३० ग्राहक मिळतात, तिथे आम्ही जातो.
आता मास्टर पीस हॉस्पिटलची सर्जरी चांगलीच व्हायरल झाली आहे. याचे कारण म्हणजे मॉडल ओमे पँगपार्नने नुकतेच या सर्जरीचे फोटो सोशल मीडियात शेअर केलेत. बऱ्याच महिन्यांपासून सिक्स पॅक अॅब्स तयार करण्याचा ओमे हा प्रयत्न करत होता, पण पोटावरील चरबी कमी होत नव्हती. तेव्हा त्याने प्लॅस्टिक सर्जरी केली.
व्यक्तीच्या पोटाच्या चारही बाजूने जमा झालेली चरबी या प्रक्रियेमध्ये दूर केली जाते. जेणेकरून खरे सिक्स अॅब्स बाहेर येतील. १९९० मध्ये पहिल्यांदा टेक्सासच्या सर्जनने अशी सर्जरी केली होती. सीईओंनी हेही सांगितले की, जी सर्जरी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये केली जात आहे, ती जरा वेगळी आहे. यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन अभ्यास करण्यात आला आणि त्यातून आम्ही आमची टेक्निक विकसित केली. सोशल मीडियावर या सर्जरीशी निगडित फोटो, व्हिडीओज समोर आले आहेत. डॉक्टर सांगतात की, या सर्जरीने अजिबात वेदना किंवा त्रास होत नाही. डॉक्टर सांगतात की, अॅब्स बनविण्यासाठी येणारे ९० टक्के लोक हे फिटनेस प्रेमी असतात.