चक्क चोरांची कंपनी, पगार 15000, आठवड्यात दोन विकली ऑफ


नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केली असून पोलिसांनी या चोरट्यांची चौकशी करताना त्यांना त्यांच्या गँगबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांची कुठली गँग नसून एक कंपनी असल्याची माहिती या चोरांनी दिली. ही कंपनी कुठली साधी-सुधी कंपनी नसून ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसारखी आहे. मोबाईल चोरण्याचे टार्गेट या चोरांच्या कंपनीमध्ये त्यांना दिले जायचे आणि त्यांनी टार्गेट पूर्ण केले तर त्याचे बक्षीसही देखील मिळायचे. त्याचबरोबर या कंपनीमध्ये काम करणाऱ्या आठवड्याला दोन दिवसांची चोरांना सुट्टीही मिळायची.

बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या ओमप्रकाश आणि ज्ञानेश या दोन चोरट्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. आणखी कोण कोण त्यांच्या गँगमध्ये आहे? याबाबत पोलिसांनी त्यांना विचारणा केली. तेव्हा आमची कुठलीही गँग नाही, तर आम्ही कंपनीत काम करत असल्याचे त्या चोरट्यांनी सागितले. पोलिसांना हे ऐकल्यावर आश्चर्य वाटले. त्यानंतर त्या चोरट्यांनी सांगितले की, एका कंपनीत आम्ही काम करतो, तिथे आम्हाला पाच दिवस काम करायचे असते आणि शनिवार, रविवार या दोन दिवशी सुट्टी असते. आम्हाला टार्गेट दिले जाते, म्हणजेच मोबाईल चोरण्यासाठी सांगितले जाते. कंपनीमध्ये नोकरीवर ठेवलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला म्हणजेच मोबाईल चोरट्याला दररोज 500 रुपये त्यासोबत शाकाहारी, मांसाहारी जेवण आणि मद्य मोफत दिले जाते. पण मोबाईल चोरण्याचे टार्गेट पूर्ण केल्यावरच त्यांना हे सर्व मिळते, असेही त्या चोरट्यांनी सांगितले.

चमन लाल नावाची व्यक्ती चोरांची ही कंपनी चालवतो. या चमन लालचा बोपी विश्वास नावाचा व्यक्ती खास आहे. ओमप्रकाश आणि ज्ञानेश या दोघांना या लोकांनी नोकरीवर ठेवले होते. यांच्याव्यतिरिक्त आणखी बऱ्याच जणांना यांनी नोकरीवर ठेवले असल्याचा संशय पोलिसांना आहे. महिन्याच्या सुरुवातीचे 10 दिवस हे चोरटे जास्त मेहनत करायचे. या चोरट्यांना दिल्लीच्या कुठल्याही भागात मोबाईल चोरण्याची मुभा होती. पण, ओमप्रकाश आणि ज्ञानेश यांची एनबी रोड ते बदरपूर, कालका मंदिर ते मां आनंदमयी मार्ग, आऊटर रिंग रोड ते बीआरटी या मार्गांवर चालणाऱ्या डीटीसी आणि क्लस्टर बस यांना खास पसंती होती. या मार्गावर ते दिवसाला 7 ते 8 मोबाईल चोरायचे. हे चोरटे मोबाईल चोरी करण्यासाठी बसच्या मागे ऑटो घेऊन जायचे. मोबाईल चोरी केल्यानंतर ते बसमधून उतरुन ऑटोत बसून पळ काढायचे, अशी माहिती या चोरट्यांनी दिली.

तिथेच दिल्लीमध्ये चोरी केलेले मोबाईल विकले जात नव्हते. तर दर आठवड्याला हे मोबाईल गुरुदासपूर येथील सनी नावाचा व्यक्ती या कंपनीकडून खरेदी करायचा. आयफोनला यामध्ये सर्वात कमी मागणी असते. कारण आयफोनचा आयएमईआय नंबर बदलणे कठीण असते. तसेच, याचे पार्ट्सही सहजासहजी विकले जात नाहीत. तर सॅमसंगच्या मोबाईलला या चोर बाजारात मोठी मागणी आहे. सर्वात जास्त नफा हा सॅमसंगच्या फोनवर होतो. पण, सॅमसंगचा महागतला मोबाईलही 10 हजारपेक्षा जास्त किंमतीत विकला जात नाही. चोरट्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुरुदासपूर येथे सनीला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.

Leave a Comment