नॉर्वेमध्ये सुरु झाले युरोपमधील पहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट


नॉर्वेमध्ये युरोपातील पहिलेवाहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट नुकतेच सुरु झाले असून पाण्यात बुडविलेल्या नळीच्या आकाराचे हे रेस्टॉरंट अंडर या नावाने सुरु केले गेले आहे. अंडरचा नॉर्वेजियन भाषेतील अर्थ आहे आश्चर्य. या रेस्टॉरंटमध्ये एका माणसाला ड्रिंकसह ८ कोर्स जेवण घेता येणार आहे मात्र त्यासाठी त्याला ३० हजार रुपये मोजावे लागतील. इतके महागडे रेस्टॉरंट असे तुम्हाला वाटत असेल तर ऐका, मालकाच्या म्हणण्यानुसार हे रेस्टॉरंट सुरु होण्यापूर्वीच येथे खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि आनंद लुटण्यासाठी ७ हजार लोकांनी अॅडव्हांस बुकिंग केले आहे. हे रेस्टॉरंट समुद्रात ५ मीटर खोल आहे.


या रेस्टॉरंटचे डिझाईन आर्किटेक्चरल फर्म स्नोहेटा यांनी केले असून ही फर्म नॉर्वे मधीलच आहे. रेस्टॉरंटचे मालक स्टीग आणि गॉट हे दोघे भाऊ आहेत. या रेस्टॉरंटचे सौंदर्य आणि वेगळेपण अनुभवण्यासाठी दरवर्षी किमान १२ हजार खवय्ये येथे भेट देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रेस्टॉरंटचा मुख्य शेफ इलियट गार्ड म्हणतो, येथील मेनू तयार करताना तो वेगळा असेल, आकर्षक असेल आणि ग्राहकाच्या जिभेची तृप्ती करणारा असेल याची काळजी घेण्यात आली आहे. हा मेनू तयार करण्यासाठी दीड वर्ष लागले असेही तो सांगतो.

ज्यांना पाण्याची ओढ आहे, आवड आहे त्या लोकांना हे रेस्टॉरंट खूपच आवडेल असे मालकांचे म्हणणे आहे. शिवाय ज्यांना समुद्री जीव, त्यांची वर्तणूक, त्यांच्या सवयी जाणून घ्यायच्या आहेत, अश्या संशोधकांना या रेस्टॉरंटची भेट ही पर्वणी असेल. ते येथे येऊन खाद्यपदार्थ चाखताना त्यांचे संशोधन करू शकतील. मालदीव मध्ये अशी अनेक रेस्टॉरंट आहेत पण युरोप मधले हे पहिलेच आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment