ज्युलीयटच्या घराच्या क्युट बाल्कनीची सैर


प्रेमवेड्यामध्ये शिरी फरहाद, लैला मजनू तसेच रोमियो ज्युलीएट यांची नावे प्रातस्मरणीय आहेत. प्रेम म्हटले कि या जोड्यांची आठवण व्हायला हवीच. त्यात शेक्सपिअरने प्रेमी दुनियेत रोमियो ज्युलीएट ला अजरामर करून ठेवले आहे. आता ही जोडी वास्तवात खरेच होती का केवळ कवी कल्पना होती यावर वाद होऊ शकेल. पण इटली मध्ये कधी गेलात, तर वेरोना शहराला आवर्जून भेट दिली पाहिजे. कारण या शहरातील ज्युलीएटच्या घराची बाल्कनी पाहण्यासाठी आणि रोमान्स फँटसी जगण्यासाठी आजही प्रेमवेडे मोठी गर्दी करतात. इतकेच नव्हे तर त्यांचे प्रेम यशस्वी होऊ दे, दिवसेदिवस वाढू दे म्हणून चक्क तशी इच्छा लिहिलेले कागद भिंतीला च्युइंगमच्या सहाय्याने चिकटवितात.


इटलीतील दोन नंबरचे मोठे मॅग्गीमार सरोवर पाहून तेथून व्हेनिसकडे येताना वेरोना या गावी थांबता येते. युरोप मधील हे जुने शहर आहे. येथे पाहण्यासारख्या अनेक इमारती आहेत. गल्ली बोळ आहेत आणि येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. एका छोट्याश्या अरुंद गल्लीत ज्युलीएटचे घर आहे. तेही अगदी साधे आणि हे घर आहे १३ व्या शतकातले.


या घराच्या अंगणात ज्युलीएटचा पूर्णाकृती पुतळा आहे. येथे यायचे ते मुख्यत्वे आपल्या प्रेमाने जखमी झालेल्या दिलाची अवस्था कागदावर लिहून ज्युलीएट पर्यंत पोहोचावी म्हणून आणि तिचे प्रेमात मार्गदर्शन मिळावे म्हणून. येथे भिंतीवर प्रेमवेड्यांनी इतकी लव कोट्स चिकटविली कि घराच्या भिंती खराब झाल्या त्यामुळे आता तेथे लव कोट चिकटविण्यासाठी पॅनल लावली गेली आहेत. आणखी एक विशेष म्हणजे या घराच्या छोट्या अंगणात असलेल्या ज्युलिएटच्या मूर्तीच्या उजव्या स्तनाला स्पर्श करून प्रेमी त्यांचे प्रेम दीर्घकाळ टिकावे असे मागणे मागतात.


हे पर्यटन स्थळ बनल्याने येथे मार्केट आहेच. तेथे ज्यूलीएटचे कशिदा काढलेले सोवेनिअर १० मिनिटात तयार करून देतात. तेही पर्यटक तगडी किंमत मोजून खरेदी करताना दिसतात.

Leave a Comment