डिस्प्लेच्या आत सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन सॅमसंग आणणार


स्मार्टफोन जायंट कोरियन कंपनी सॅमसंगने फुल स्क्रीन व अतिशय सडपातळ बेजलचा सेल्फी कॅमेरासाठी केवळ एक पंचहोल असलेला एस १० सिरीज स्मार्टफोन सादर केल्यावर आता त्यापुढचे पाउल टाकण्यासाठी तयारी केली आहे. एस १० सिरीज मध्ये डिस्प्लेवर केवळ एक डॉट सेल्फी कॅमेरयासाठी दिसत होता तो डॉटही आता कंपनी काढून टाकणार आहे. म्हणजेच डिस्प्लेच्या आतच सेल्फी कॅमेरा सेट करण्याचे नवे तंत्रज्ञान कंपनी विकसित करत आहे. कोरियन मिडिया आयच्या रिपोर्टमध्ये हि माहिती दिली गेली आहे.

तसेच चायनीज मिडिया चॅनल माय ड्रायव्हर्सच्या रिपोर्टनुसार सॅमसंग १०० टक्के स्क्रीन टू बॉडी रेशोसह स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. यात स्क्रीन कॅमेरा तंत्रज्ञान सपोर्टमुळे डिस्प्ले बाबत पूर्ण वेगळा अनुभव युजर घेऊ शकेल. युजरला गरज असेल तेव्हा कॅमेरा एरीया मध्ये स्क्रीन पूर्ण ट्रान्स्परंट होईल आणि युजर सेल्फी काढू शकेल. इनबिल्ट फिंगरप्रिंट सेन्सरप्रमाणेच हा इनबिल्ट कॅमेरा सेन्सर काम करेल आणि स्क्रीनवर टच करताच फोन अनलॉक होईल. अन्य सर्व सेन्सरप्रमाणेच कॅमेराही डिस्प्ले खालीच सेट केलेला असेल.

कंपनीचे उपाध्यक्ष यांग ब्यूक हुक या संदर्भात म्हणाले कंपनी नवीन तंत्रज्ञान विकसित करते आहे पण ते फोन बाजारात येण्यास कदाचित एखादे वर्ष लागू शकेल. मोठ्या प्रमाणावर त्यांचे उत्पादन होण्यास आणखी जादा वेळ लागेल. फोन मधील कॅमेरा तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे आणि भविष्यात कॅमेरा होल फोनवर दिसणार नाही हे त्यांनी मान्य केले.

Leave a Comment