वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – विश्वास नांगरे पाटील


नाशिक – १३ मेपासून वाहतूक नियमांची जनजागृती आणि हेल्मेटसक्तीबाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार असून त्याअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

मागील वर्षभरात शहरात झालेले अपघात आणि सद्यस्थितीतील अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी एका व्यक्तिचा दर दिवसाआड अपघातात मृत्यू होतो. यावर्षी जानेवारीपासून एप्रिल महिन्यापर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असल्यामुळे रस्ते वाहतूक अधिकार सुरक्षित करण्यासाठी नाशिक पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनीही काही दिवसात हेल्मेट आणि इतर नियमांबाबत अभ्यास करावा. त्यानंतर मात्र थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला.

एकाच वेळी वाहतूक पोलीस विभाग आणि सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. विनापरवाना, मद्यप्राशन करून आणि उलट दिशेने वाहन चालवणे. तसेच ट्रिपल सीट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवल्यास थेट कारवाई होणार असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment