क्युबा – अमेरिकेतील फ्लोरिडा येथे क्यूबावरुन येणारे बोईंग 737 विमान हे लँडिंग करताना धावपट्टीलगतच्या नदीत कोसळल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी या घटनेत झालेली नसून विमानतळावरील अधिकाऱ्यांनी विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती दिली.
धावपट्टीवरुन घसरले आणि नदीत कोसळले विमान
स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री बोईंग 737 हे विमान क्यूबावरुन फ्लोरिडा येथे पोहोचले. फ्लोरिडामधील जॅक्सनव्हिले विमानतळावर विमान लँडिंग करत होते. विमान यादरम्यान धावपट्टीवरुन घसरले आणि धावपट्टीच्या लगतच्या सेंट जॉन नदीत कोसळले. सुदैवाने विमान पूर्णपणे न बुडाल्यामुळे विमानातील सर्व प्रवासी बचावले आहेत. प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. आपातकालीन यंत्रणांचे पथक आणि रुग्णवाहिका दुर्घटनेची माहिती समजताच विमानतळावर पोहोचल्या. विमानात १३६ प्रवासी आणि सहा कॅबिन क्रू कर्मचारी होते.