सत्ता आणि पैशासाठी केजरीवालांचे काँग्रेससमोर लोटांगण !


अहमदनगर – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससोबत निवडणुका लढवणार असणाऱ्या बातम्यांवर अण्णा नाराज आहेत.

या पक्षाच्या विरोधात आम्ही भ्रष्टाचारामुळे एक मोठे आंदोलन केले आणि स्वतः केजरीवाल या आंदोलनात सहभागी झाले होते. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तेच केजरीवाल आज सत्ता आणि पैशासाठी काँग्रेससोबत जात असल्याचे पाहून दुःख होत असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. मला कधी काळी गुरू मानणारे आज मला विसरले याची खंतही अण्णांनी व्यक्त केली. पण अण्णांनी हे सांगताना मला संपूर्ण देश ओळखतो, त्यामुळे एखाद्या व्यक्तीने मला विसरले तर काही फरक पडत नसल्याचेही सांगितले.

ज्या पक्षाविरोधात सत्ता आणि पैशासाठी आंदोलन केले त्यांच्यासोबत ते जात असल्याबद्दल वाईट वाटत असल्याचे अण्णांनी सांगितले. सत्तेत इतर अनेक पक्ष भ्रष्टाचाराच्या मार्गाने असताना अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून मला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. देश या पक्षाच्या माध्यमातून बदलेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment