लदाखमधील नैसर्गिक आईस कॅफे


उन्हाळ्यात कुठेतरी थंड ठिकाणी जाण्याचा पर्यटकांचा प्रयत्न असतो आणि हे ठिकाण लदाखसारख्या दुर्गम भागात असेल तर हाडे गोठविणाऱ्या थंडीचा अनुभव ऐन उन्हाळ्यात घेता येतो. शिवाय इतक्या थंडीत गरमागरम चहा, कॉफी मिळाली तर काय बरे होईल असेही वाटते. उन्हाळ्यात थंडी आणि या थंडीत गरमागरम चहा कॉफी शिवाय सोबत नुडल्सचा समाचार घ्यायचा असेल आणि तोही समुद्र सपाटीपासून १४ हजार फुटांवर, तर मनाली लेह मार्गावरील या आईस कॅफेची भेट चुकवून चालणार नाही. मात्र हे लक्षात घ्यायला हवे कि हे कॅफे एप्रिल आणि मे महिन्याचा मध्य इतकेच सुरु असते कारण नंतर तेथील बर्फ वितळू लागते. बोर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि स्थानिक यांच्या मदतीने हे कॅफे उभारले गेले आहे.


हे भारताचे पाहिले नैसर्गिक आईस कॅफे आहे. ऐन थंडीत ते तयार केले जाते. त्यासाठी प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक ( थ्री इडियट फेम), याच्या आईस स्तूपा प्रोजेक्टवरून प्रेरणा घेतली गेली आहे. हे कॅफे एखाद्या बौद्ध स्तुपाप्रमाणे किंवा बर्फाच्या टेकडीच्या आकाराचे आहे. या भागात हिवाळ्यात बर्फ असते आणि वसंत ऋतूमध्ये ते वितळून जाते. याच थंडीतील बर्फाला डोंगरासारखा आकार देऊन पाणी साठविले जाते आणि जेव्हा बर्फ वितळू लागते तेव्हा ते पाणी सिंचनासाठी वापरले जाते. लदाखमध्ये असे आईस स्तूपा उभारण्याची कल्पना प्रथम वान्चुंग यांना सुचली आणि त्याचा उन्हाळ्यात पाणी मिळविण्यासाठी खूपच उपयोग होत असल्याचे दिसून आले आहे.


भारताच्या या पहिल्या आईसकॅफे मध्ये चहा, कॉफी आणि गरम नुडल्स मिळतात. बोर्डर रोड ऑर्गनायझेशनचे अधिकारी म्हणाले, येथे पर्यटक येतात तेव्हा इतक्या उंचीवर त्यांना चहा, कॉफी मिळाली तर बरे असे वाटत असते म्हणून आम्ही हे कॅफे सुरु केले आहे. त्यामुळे पर्यटकांना गरम पेयाचा आस्वाद घेता येतो आणि थंडीत थोडी उब मिळविता येते. हि कल्पना खूपच यशस्वी झाली असून त्यामुळे पर्यटका अधिक संख्येने येऊ लागले आहेत.

Leave a Comment