भोपाळ मधले कर्फ्यूवाली माता मंदिर


भारतात देवी, माता यांची अनेक मंदिरे आहेत आणि विविध नावांनी ती प्रसिद्धही आहेत. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ मध्ये तुलनेने अलीकडच्या काळात म्हणजे १९८२ साली बांधले गेलेले माता मंदिर कर्फ्यूवाली माता मंदिर या नावाने देशभर प्रसिध्द आहे इतकेच नव्हे तर हे मंदिर या शहराची खास ओळख बनले आहे. लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी नुकतीच या मंदिराला भेट देऊन तेथे पूजा केली, भजनकीर्तन केले. महत्वाचे म्हणजे वादग्रस्त विधाने केल्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर निवडणूक आयोगाने ७२ तास प्रचार करण्यावर बंदी घातली होती आणि ती बंदी संपताच सर्वप्रथम त्या या मातेच्या मंदिरात दाखल झाल्याने पुन्हा एकदा हे मंदिर चर्चेत आले आहे.


या मंदिरला कॅर्फ्यूवाली माता मंदिर हे नाव कसे पडले त्याची हकीकत मोठी मजेशीर आहे. पूर्वी येथे मंदिर नव्हते पण येथे नवरात्रात देवी स्थापना केली जात असे. १९८२ मध्ये हा मंडप आणि देवी प्रतिमा स्थापन करण्यावरून वाद झले आणि त्यातून वातावरण बिघडले. त्यानंतर प्रशासनाने येथे कर्फ्यू लावला आणि तो महिनाभर सुरु होता. नंतर मात्र येथे मंदिर बांधून त्यात देवीच्या मूर्तीची स्थापना केली गेली. या पूर्वी भोपाल मध्ये धार्मिक विवादामुळे कधीच कर्फ्यू लागला नव्हता त्यामुळे या मंदिरचे नामकरण कर्फ्यूवाली माता मंदिर असे झाले. असे सांगतात या मंदिरात शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते श्री यंत्राची स्थापना केली गेली आहे. आज हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे स्थान बनले असून नारळ आणि त्यासोबत आपली मनोकामन लिहिलेली चिट्ठी देवीला वाहण्याची परंपरा येथे सुरु झाली आहे.


या मंदिरात मौल्यवान धातूंचा वापर मोठ्या प्रमाणात झाला असून त्यासाठी कुणाकडूनही आर्थिक देणग्या घेतल्या गेलेल्या नाहीत. भाविक जे मनोभावे अर्पण करतात त्यातूनच हा खर्च केला गेला आहे. मंदिरात मातेसाठी सोन्याचे सिंहासन, दागदागिने, मुकुट शिवाय चांदीचे दरवाजे, महिरप, भिंतीवर सोन्याचे पत्रे आहेत. विशेष म्हणजे हे मंदिर केवळ हिंदूंचे नाही तर सर्वधर्मीय लोकांचे श्रद्धा स्थान आहे. मातेचे सिंहासन जयपूरवाले मुस्लीम कारागीर शिजजुद्दिन चौधरी यांनी बनविले आहे.

Leave a Comment