बँकनोट ऑफ द इअर ठरली कॅनडाची नोट


कॅनडा मधील १० डॉलर मूल्याची नोट बँकनोट ऑफ द इअर २०१८ अवार्ड विजेती ठरल्याचे इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी व बँक ऑफ कॅनडा यांनी सोशल मिडीयावर जाहीर केले आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्वित्झर्लंड, नॉर्वे सह १५ देशांनी भाग घेतला होता. भारताने या स्पर्धेत भाग घेतला नव्हता.

कॅनडाच्या या नोटेचे डिझाईन अतिशय सुंदर असून त्यावर नागरिक अधिकारांसाठी लढा दिलेल्या सामाजिक कार्यकर्त्या वॉयल डेस्मोंड यांची प्रतिमा आहे आणि तीच या नोटेला हा सन्मान मिळवून देण्यास कारणीभूत ठरली आहे असे सांगितले जात आहे. शिवाय ही नोट जगातील पहिली व्हर्टिकल नोट आहे. जांभळ्या रंगाची ही नोट बँक ऑफ कॅनडाची महिला प्रतिमा प्राधान्याने असलेली पहिलीच नोट आहे. ही नोट नोव्हेंबर २०१८ मध्ये सादर केली गेली असून तिच्या मागच्या बाजूवर कॅनडा मानवाधिकार संग्रहालयाचा फोटो आहे.

कॅनडाच्या हॅलीफ्लॅक्स मध्ये जन्मलेल्या वॉयलला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. ती उद्योजिका होती पण १९४६ मध्ये न्यू ग्लासगो नोवास्कोरीया येथे एका चित्रपटगृहात तिने वर्णद्वेषाला आव्हान दिला आणि रोजलंड थियेटर सोडून जाण्यास नकार दिला होता. त्याविरोधात तिने न्यायालयात धाव घेतली. अश्वेत महिलानाही सुंदर दिसण्याचा अधिकार आहे यासाठी तिने चळवळ सुरु केली कारण तिला ती अश्वेत असल्याने ब्युटीशियनचा कोर्स करण्यास परवानगी नाकारली गेली होती. तिने माँट्रीयल आणि न्यूयॉर्क मधून ब्युटीशियनचे प्रशिक्षण घेऊन अश्वेत महिलांसाठी ब्युटी सलून सुरु केले होते.

Leave a Comment