मुंबई : अनेकदा आधारकेंद्राचे उंबरठे आधारकार्डच्या पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी झिझवावे लागत होते. तसेच निवासी पत्ता यासाठी असणे गरजेचे होते. पण या प्रक्रियेत सरकारने बदल केल्यामुळे याचा मोठा फायदा अनेकांना होणार आहे. निवासी पत्ता बदलण्याकरीता अर्जदाराला कोणत्याही प्रकारचा पुरावा देण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे अर्जदाराचा वेळदेखील वाचणार आहे. पण, अर्जदाराला यासाठी यूआयडीएआयकडून पत्ता प्रमाणीकरण पत्र मिळवावे लागणार आहे. पुढील प्रक्रिया यानंतरच पार पाडता येणार आहे.
आधारकार्डच्या पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी आता पुराव्याची गरज नाही
महत्त्वाचे कागदपत्र म्हणून आधारकार्ड हे वापरले जाते. बॅंकेत खाते उडण्यापासून, सिमकार्ड घेण्यापर्यंत तसेच इतर महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड हे आवश्यक आहे. पण अनेकदा चुकीचा तपशील आधारकार्डमध्ये असल्यामुळे संबधित व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याचा मोठा फटका एका ठिकाणावरुन दुसरीकडे राहायला गेलेल्या लोकांना बसत होता. आधारकार्डमधील पत्ता बदलण्याठी स्थलांतरित झालेल्या लोकांना मोठी धावपळ करावी लागत होती. महत्त्वाचे म्हणजे याकरिता पत्त्याशी निगडीत पुरावा देणे गरजेचे होते. परंतु नवीन ठिकाणी राहण्यासाठी गेलेल्या अनेक लोकांजवळ पत्याशी संबधित पुरावा नसल्यामुळे त्यांना आधारकार्डमधील बदल करणे कठीण जात होते.
यूआयडीएआय वेबसाइटच्या मते, आपला मोबाइल नंबर पत्त्यामध्ये बदल करण्याआधी आधार नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करुन घेणे गरजेचे आहे. जर मोबाइल नंबर आधारशी नोंदणीकृत नसेल तर लॉग इन करता येणार नाही.
पत्ता प्रमाणीकरण पत्र मिळविण्यासाठी ज्या रहिवाशांजवळ पत्ता संबधित पुरावा नाही त्यांना यूआयडीएआयने पाठवलेल्या पत्त्याचे ओळख पत्र वापरून त्यांच्या पत्त्यावर बदल करता येणार आहे. पत्ता प्रमाणीकरण पत्र मिळवण्याकरीता निवासी पत्ताधारकाकडून संमती मिळवणे आवश्यक आहे. पत्ताधारक हा कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र, जमीनदार इत्यादी असू शकतो, जिथे निवासी सध्या रहात आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथमतः अर्जदाराने नोंदणीकृत मोबाईल नंबर आधार बरोबर लॉग इन करावे. त्याचबरोबर आधारकार्डमधील माहिती भरुन सेवा विनंती क्रमांक (एसआरएन) मिळवावा. पत्ताधारक म्हणून निवडलेल्या व्यक्तीच्या नावाचा अर्जदाराने उल्लेख करुन त्याचा मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे.
पत्ताधारकाच्या मोबाइलवर त्यानंतर ओटीपी पाठवण्यात येईल. पत्ताधारकांना संमती देण्याकरीता होय आणि नाही असा पर्याय उपलब्ध असणार आहे. होय या पर्यायावर पत्ताधारकांने क्लिक केल्यानंतरच पुढील कामास सुरुवात केली जाणार आहे. पत्ताधारकाच्या मोबाईलमध्ये आलेला ओटीपीची पुष्टी करुन एसआरएन पत्त्यासह लॉग इन करा, आवश्यक असल्यास संपादन आणि सबमिट करा.
केवळ आधार कार्डधारकाचे पत्ते ऑनलाइन सुधारित केले जाऊ शकतात. बायोमेट्रिक किंवा इतर लोकसंख्याशास्त्रीय डेटामधील बदल, जन्मतारीख, लिंग, मोबाइल आणि ईमेलमध्ये निवासींना यूआयडीएआय नावनोंदणी करण्यासाठी आधारकेंद्रात भेट द्यावे लागेल.