भाजप आमदाराला माहित नाही गडचिरोली नक्की कोणत्या राज्यात


कर्नाटक – नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडाजवळ राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला. शीघ्रकृती पथकाचे (क्यूआरटी) १५ जवान त्यात शहीद झाले. या हल्ल्यात जवानांना घेऊन जाणाऱ्या खासगी गाडीचा चालकही मृत्युमुखी पडला. आरोप प्रत्यारोपांचे राजकारण या हल्ल्यानंतर सुरु झाले आहे. पण गडचिरोली छत्तीसगडमध्ये असून काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात हा हल्ला झाल्याचा जावई शोध या नक्षली हल्ल्यावरुन राजकारण करताना भाजपच्या एका नेत्याने लावला आहे.

ट्विट करुन गडचिरोलीतील हल्ल्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरत गडचिरोली छत्तीसगडमध्ये असल्याचे कर्नाटकमधील चिकमंगळूर येथील भाजपचे आमदार सी. टी. रवी यांनी म्हटले आहे. रवी यांनी केलेल्या ट्विटमध्ये, आपले शूर जवान गडचिरोलीमध्ये झालेल्या भ्याड नक्षली हल्ल्यात शहिद झाले. मी शहीद जवानांसाठी प्रार्थना करतो. काँग्रेस छत्तीसगडमध्ये सत्तेत आल्यापासून देशद्रोह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांना शोधून कठोर शिक्षा द्यायला हवी, असे म्हटले आहे.

अनेकांनी रवी यांच्या या ट्विटनंतर त्यांना गडचिरोली छत्तीसगडमध्ये नसून महाराष्ट्रात असल्याचे सांगितले आहे. नक्षली हल्ल्याचे राजकारण करताना कमीत कमी हल्ला झालेले ठिकाण कुठे आहे याची तरी माहिती करुन घ्या असेही नेटकऱ्यांनी रवी यांना सुनावले आहे.

Leave a Comment