मालकाच्या पैशाचा कुत्राने केला चट्टामट्टा


कुत्रा हा प्राणी माणसाचा सच्चा मित्र असतो असे म्हटले जाते. इमानदारी शिकावी ती कुत्र्याकडून असेही म्हटले जाते कारण कुत्रा मालकाच्या जीवाला जीव देणारा सर्वात वफादार प्राणी आहे. कुत्रा काय काय खातो याची यादी मोठी असू शकेल पण कुत्रे पैसे खात असेल असे कुणीच मान्य करणार नाही. नॉर्थ वेल्स मध्ये राहणाऱ्या ज्युडिथ आणि नील राईट या जोडप्याच्या लेब्रोडोर जातीच्या ९ वर्षाच्या ओझी नावाच्या कुत्र्याने त्याच्या मालकाला निराळ्याच संकटात टाकले. या कुत्र्याने मालकाचे १६० पौंड म्हणजे सुमारे १४५०० रुपयांचा चक्क चट्टा मट्टा केला आणि त्याच्या पोटात गेलेले हे पैसे बाहेर काढण्यासाठी नील राईट यांना आणखी १३० पौड म्हणजे १२ हजार रुपये खर्चावे लागले.

झाले असे कि ज्युडिथ आणि नील शॉपिंग साठी गेले तेव्हा ओझी घरात एकटा होता. जेव्हा हे जोडपे बाजारातून परतले तेव्हा घराची अवस्था बघून त्यांनी डोक्याला हात लावला. स्वयंपाक घरात आणि हॉलमध्ये नोटांचे तुकडे पडले होते आणि ओझी अगदी साळसूदपणे कोपऱ्यात बसला होता. ओझीनेच हा सारा कारभार केला आहे हे नीलच्या लगेच लक्षात आले.


घराच्या लेटर बॉक्स मध्ये एक पॅकेट एका माणसाने टाकले होते ते ओझीने फाडले आणि आतील २० पौंड मूल्याच्या अनेक नोटा खाल्ल्या बाकीच्या फाडल्या. ज्या माणसाने हे पॅकेट टाकले होते त्याला नीलने फोन केला आणि किती रक्कम होती याची विचारणा केली तेव्हा ओझीने किती रक्कम खाल्ली असावी याचा अंदाज आला. नीलने ओझीला पशुवैद्याकडे नेले आणि तेथे डॉक्टरने ओझीच्या पोटातून नोटा आणि प्लास्टिक मनी बाहेर काढला तयासाठी नील यांना डॉक्टरला १३० पौड द्यावे लागले. म्हणजे एकूण नुकसान २९० पौंडांचे झाले. ओझी छोटा होता तेव्हापासून तो आमच्याकडे आहे पण त्याने कधीच पैसे खाल्ले नव्हते असे नील यांनी सांगितले. आता त्यांनी लेटर बॉक्सला जाळी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. नील यांनी ओझीने खराब केलेल्या १६० पौंडापैकी ८० पौंड नोटा बँकेतून बदलून घेतल्या असे समजते.

Leave a Comment