नॉर्वे किनाऱ्याला आलेला पांढरा देवमासा रशियन हेर?


नॉर्वेच्या किनाऱ्याला काही दिवसापूर्वी आलेला पांढरा देवमासा म्हणजे व्हेल हा रशियन हेर म्हणून प्रशिक्षित केलेला असावा असा अंदाज नॉर्वे मधील सागरी प्राणी तज्ञ व्यक्त करत आहेत. या माशाच्या शरीरावर एक पट्टा बांधला गेला होता आणि त्यात कॅमेरा होल्डर होता असे समजते. नॉर्वेजिअन मच्छीमारानी या व्हेलच्या शरीरावर बांधला गेलेला पट्टा मोठ्या मुश्किलीने वेगळा केला तेव्हा कॅमेरा होल्डर दिसला मात्र त्यात कॅमेरा नव्हता. ज्या भागातून हा व्हेल आला त्या भागात रशियाचा नौसेना अड्डा आहे. या व्हेलच्या अंगावर रशियातील सेंट पिट्सबर्गकडे इशारा करणारे एक निशाण आणि फोन नंबर होता त्यामुळे रशियन नौसेनेने प्रशिक्षित केलेला हा व्हेल असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


हा देवमासा आर्क्टिक द्वीप इंगोया मध्ये अनेकदा नॉर्वेच्या नावांजवळ आला होता. येथून रशियन नौसेना ठाणे ४१५ किमी दूर आहे. हे मासे आर्क्टिक पाण्यातच राहतात. एका रशियन अधिकाऱ्याने मासे ट्रेन करण्याचे प्रयोग रशिया सध्या करत नसल्याचे मात्र पांढऱ्या देवमाश्यांना यापूर्वी ट्रेनिंग दिले जात असल्याचे कबुल केले आहे. त्यातला हा मासा असू शकतो असा अंदाज आहे. मात्र हा मासा हेरगिरी करण्यासाठी नॉर्वे किनाऱ्यावर नक्कीच आला नव्हता असे रशियन अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्याचा म्हणण्यानुसार जर तो हेरगिरी साठी आला असेल तर त्याच्यापाठीवर फोन नंबरची चिट्ठी लावण्याची चूक केली जाणार नाही.


रशियन नौसेनेने डॉल्फिन माश्यांना हेरगिरी साठी प्रशिक्षित केल्याचे यापूर्वी जाहीररित्या कबुल केले आहे. क्राईमिया मिलिटरी डॉल्फिन केंद्रात वेगवेगळी कामे करण्याचे प्रशिक्षण डॉल्फिनना दिले जाते. त्यात जलक्षेत्राचे रक्षण, परदेशी पाणबुडे आल्यास त्यांचा निकाल लावणे, विदेशी जहाजावर स्फोटके टाकणे अशी कामे शिकविली जातात. पांढरे देवमासे डॉल्फिन प्रमाणे बुद्धिमान असतात आणि त्यानाही कुत्र्यासारखे लष्करी कामासाठी प्रशिक्षित करता येते. नॉर्वे किनाऱ्यावर आलेला देवमासा वारंवार नॉर्वे नौकांजवळ येत होता त्यामुळे तो भुकेला असावा असा तर्क आहे.

यापूर्वीही समुद्री जीवांचा युद्धात वापर केला गेला आहे. शीतयुध्द काळात अमेरिकन नौसेनेने डॉल्फिन आणि सी लायन यांना स्फोटके ओळखणे, बेकायदा पाण्यात घुसखोरी करणाऱ्यांवर हल्ला करणे असे प्रशिक्षण दिले होते.

Leave a Comment