पादचाऱ्यांसाठी या गल्लीत आहेत ट्राफिक लाईट


झेक रिपब्लिकचे प्राग हे शहर अतिशय देखणे म्हणून पर्यटकात लोकप्रिय आहे. राजधानीचे हे शहर खूप मोठे आणि अनेक ऐतिहासिक वास्तू असलेले, इतिहासाने व येथील संस्कृतीने समृध्द आहे. या शहराचे आणखी एक खास विशेष आहे ते म्हणजे येथील एक गल्ली. जगात सर्वधिक अरुंद गल्ली असा तिचा लौकिक असून या गल्लीत पादचाऱ्यांसाठी ट्राफिक लाईट लावले गेले आहेत.


याचे मुख्य कारण म्हणजे ही गल्ली अवघी ५० सेंटीमीटर रुंदीची आहे आणि केवळ शहरातील नागरिकच नाही तर प्रागला भेट देणारे पर्यटक या गल्लीला आवर्जून भेट देतात. ही गल्ली इतकी अरुंद आहे कि त्यातून एकावेळी दोन माणसे बरोबर चालू शकत नाहीत. त्यामुळे समजा कुणी अमोरासमोर आलेच तर कुणातरी एकाला उलटे चालत जाऊन दुसऱ्याला रस्ता द्यावा लागतो. त्यामुळे येथे ट्राफिक लाईट लावले गेले आहेत. ते गल्लीच्या दोन टोकांना आहेत. या गल्लीची लांबी १० मीटर आहे.


विशेष म्हणजे ही गल्ली अनेक घराच्या मधून जाते आणि हा रस्ता चक्क एका रेस्टॉरंटला जाऊन मिळतो. या गल्लीत पर्यटक प्रामुख्याने फोटो काढण्यासाठी येतात. आणि ट्राफिक लाईट लावूनही आत जाणारे लोक मध्येच अडकतात कारण ट्राफिक लाईट फार गांभीर्याने घेतले जात नाहीत परिणामी गल्लीत जाम लागतो.

Leave a Comment