वाराणसी – वाराणसीतून पंतप्रधान मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवत असलेले समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि बडतर्फ बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
यामुळे रद्द झाली तेजबहादूर यांची उमेदवारी
चुकीच्या पद्धतीने माझा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. काल संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत मला पुरावे जमा करण्यास सांगितले होते. पुरावे आम्ही सादर केले तरीही माझी उमेदवारी रद्द करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी आम्ही जाऊ, अशी प्रतिक्रिया तेजबहादूर यादव यांनी दिली. माझ्याकडे मागण्यात आलेले सर्व पुरावे आम्ही सादर केले. तरीही यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, असे यादव यांचे वकील राजेश गुप्ता यांनी सांगितले.
निवडणूक आयोग राज्य आणि केंद्र सरकारच्या नोकरीतून निष्काषित करण्यात आलेल्या व्यक्तीकडून एक प्रमाणपत्र मागत असते. सदर व्यक्तीला अप्रामाणिक वर्तणूक किंवा भ्रष्टाचारामुळे नोकरीवरुन काढून टाकण्यात आले नाही, अशा आशयाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. ११ वाजेपर्यंत प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचा उमेदवारी रद्द करण्यात आली, अशी माहिती वाराणसी जिल्हा मॅजिस्ट्रेट यांनी दिली.
पंतप्रधान मोदींच्या विरोधात तेजबहादूर यादव अपक्ष निवडणूक लढणार होते. त्यांना सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शेवटच्या क्षणी समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली. तर, पूर्वीच घोषित केलेल्या शालिनी यादव यांचा उमेदवारी अर्ज पक्षाने परत घेतला.