अॅव्हेंजर्ससाठी आयर्नमॅनने घेतलेल्या मानधनात तयार होतील अनेक हिंदी चित्रपट


अॅव्हेंजर्स एंडगेम या सुपरहिरोपटाने पहिल्या पाच दिवसांत १ हजार कोटींपेक्षा जास्त कमाई करत जगभरात सध्या धुमाकूळ घातला आहे. आयर्नमॅन या सुपरहिरोपटापासून २००७ साली सुरू झालेली अॅव्हेंजर्स मालिका आज जगातील सर्वात मोठी चित्रपटमालिका म्हणून ओळखली जाते. आयर्नमॅन व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर याचा मार्व्हल कंपनीने मिळवलेल्या या भव्यदिव्य यशामागे सिंहाचा वाटा आहे आणि आयर्नमॅनला या कामगिरीचे बक्षीस म्हणून तब्बल ५२४ कोटी रूपयांचे मानधन दिले गेले आहे. बॉलिवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाहूबलीपेक्षाही ही रक्कम अधिक आहे. ४३० कोटी रूपये बाहूबलीच्या दोन्ही भागांच्या निर्मितीसाठी खर्च केले गेले होते. परंतु एवढी मोठी रक्कम मार्व्हलने एका कलाकाराला देऊन सर्वांनाच अचंबित केले आहे.

मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्ससाठी अभिनेता रॉबर्ट डाऊनी हा हुकुमाचा एक्का असल्याचे म्हटले जाते. त्याच्याच लोकप्रियतेचा वापर करून आजवर मार्व्हलने सलग २२ सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच मार्व्हल कंपनी कधीकाळी कर्जबाजारी झालेली असताना ही कंपनी वाचवण्यासाठी त्याने कोट्यावधींची गुंतवणूक केली होती. या मदतीची परतफेड म्हणून २००७ ते २०१९ दरम्यान आलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या नफ्याचा एक हिस्सा रॉबर्ट डाऊनीला दिला जातो. अॅव्हेंजर्स एंडगेमचा पहिला भाग अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरसाठी त्याला मानधन म्हणून २१६ कोटी रूपये देण्यात आले होते. शिवाय चित्रपटाच्या एकूण नफ्यामधून ७३६ कोटी रूपये देण्यात आले होते. त्यामुळे आजच्या तारखेला रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर हा जगातील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

Leave a Comment