नारायण साईच्या शिक्षेवर पत्नी जानकी हरपलानी आनंदी


इंदूर – न्यायालयाने आसाराम याचा मुलगा नारायण साई याला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षा सुनावली आहे. नारायण साई याची पत्नी जानकी हरपलानी यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी त्याबाबत आनंद व्यक्त केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नारायण साई आणि आसाराम या दोघांनी अत्याचार केलेल्या त्या सर्व पीडित महिलांना खरा न्याय मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आसाराम आणि नारायण साई याने धर्माच्या नावाने महिलांचे शोषण केले. अत्याचाराची त्याने परिसिमा गाठली होती. आसाराम आणि नारायण साई याला श्रध्दाळू महिला आपला पिता, भाऊ आणि गुरू मानत असे. पण त्यांचा या दोघांनी विश्वासघात केला. महिलांच्या अब्रूवर या दोघांनीही घाला घातला असून ते एक मोठे पाप आहे.

त्या लोकांनाही न्यायालयाच्या या निर्णयामुळे धडा मिळेल जे धर्माच्या नावाने महिलांचे शोषण करतात. न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्वास होता. न्याय, धर्म आणि सत्याचा न्यायालयाच्या या निर्णयामुळे विजय झाला आहे, असे जानकी यांनी म्हटले आहे. तसेच साईविरोधात त्यांनीही न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. न्यायालयात मलादेखील न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, नारायण साई याला सुरत सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाखांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात आसाराम बापूदेखील शिक्षा भोगत आहे.

Leave a Comment