130 किमी वेगाने धावणार मुंबई-पुणे आणि कोकणाकडे जाणाऱ्या एक्सप्रेस


मुंबई – मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी तसेच मुंबई-मडगाव मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसला लिकें हाँफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ताशी 130 किमी वेगाने धावण्याची क्षमता या एक्सप्रेसना प्राप्त होणार आहे. ‘एलएचबी’ तंत्रज्ञानाचे हायफाय डबे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास घडविण्यासाठी लावण्यात येणार आहेत. पंचवटी एक्सप्रेसह मध्य रेल्वेच्या 24 गाडय़ांना जर्मन तंत्रज्ञानाचे अशा प्रकारचे आधुनिक डबे बसविण्यात आले आहेत.

10 जून ते 31 ऑगस्टदरम्यान एलएचबीचे 22 डबे ट्रेन क्र. 10111/2 सीएसएमटी ते मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. 10103/4 सीएसएमटी ते मडगाव मांडवी एक्सप्रेसला लावण्यात येणार आहेत. याची संरचना प्रथम, द्वितीय श्रेणी एक एसी डबा, द्वितीय श्रेणीचा एक डबा, तृतीय श्रेणीचे 4 एसी डबे, 11 स्लीपर क्लास, 2 सामान्य डबे आणि एक पँट्री डबा अशी असेल. तर, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी एक्सप्रेसच्या डब्यांच्या जागी अपघातरोधक डबे (एलएचबी) बसविण्याला रेल्वे मंडळाची मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही एक्सप्रेसमध्ये एलएचबी डब्यांमुळे ताशी 130 किमी धावण्याची क्षमता येईल. या कामाला मंजुरी मिळाली असून सहा ते आठ महिन्याच्या आत दोन्ही एक्सप्रेस एलएचबी डब्यांसह मार्गस्थ होतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

नव्या डब्यांमुळे प्रवाशांना गाडीतून फिरण्यास जास्त जागा मिळेल. डब्यामधील बेसिन, टॉयलेट यांच्या रचनेत सुधारणा केली आहे. यासह दरवाजातील जुनी चिंचोळी जागा वाढविली आहे. त्यामुळे आता गाडीत चढताना तसेच उतरताना प्रवाशांना धक्काबुकी, गर्दीला सामोरे जावे लागणार नाही. या डब्यांची लांबी आणि रुंदी जास्त असल्याने प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल.

Leave a Comment