वाढत चाललाय ट्रम्प यांचा खोटारडेपणा


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटारडेपणा दिवसेनदिवस वाढत चालला असून त्यांच्या आत्तापर्यंतच्या ८२७ दिवसांच्या कारकिर्दीत त्यांनी १० हजाराहून अधिक खोटे आणि भ्रामक दावे केले असल्याचे वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राने सुरु केलेल्या फॅक्ट चेकिंग वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. यात असे म्हटले गेले आहे, ट्रम्प यांनी पहिले ५ हजार खोटे अथवा भ्रामक दावे करण्यासाठी ६०१ दिवस घेतले होते म्हणजे त्या काळात ते रोज ८ खोटे दावे करत होते मात्र पुढच्या ५ हजार खोट्या दाव्यांसाठी त्यांना २२६ दिवस लागले. याचाच अर्थ या काळात ते रोज जनतेसमोर २३ खोटे दावे करत होते.

ट्रम्प यांच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांनी केलेल्या भ्रामक घोषणांची संख्या ८ हजारावर होती. तर हि संख्या २६ एप्रिल रोजी १० हजार झाली.


तज्ञांच्या मते खोटे दावे करण्यामागे नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुका कारणीभूत आहेत. या काळात मेक्सिको सीमेवर भिंत बंधने, स्थलांतरित मुद्दे मुख्य होते तसेच ट्रम्प यांनी या काळात केलेल्या दर ५ दाव्यामागे १ दावा खोटा होता. रॅलीज मध्ये बोलताना ट्रम्प थापा मारत होतेच पण त्यांच्या ट्विटर अकौंटवर तर अश्या भ्रामक दाव्यांची भरमार आहे. केवळ २५ ते २७ एप्रिल या काळात त्यांनी १७१ चुकीच्या बाबी बोलण्याचा पराक्रम केला असून त्यात जपान चीन आणि युरोपिअन युनियन बरोबर व्यापार घाटा, टॅक्स सिस्टीम आणि ओबामा केअर बाबतही खोटी माहिती दिली आहे.

नाटोचा १०० टक्के खर्च अमेरिकेने केल्याची थाप ट्रम्प यांनी मारली आहे तसेच सौदी व अमेरिका यांच्या मध्ये ४५० अब्ज डॉलर्सचे सौदे झाल्याचे त्यांनी सांगितले आहे मात्र रक्षा क्षेत्रातील तज्ञांनी ते फेटाळले आहे. वॉशिंग्टन पोस्ट रिपोर्ट नुसार त्यांचा फॅक्ट चेकर डेटा बेस ट्रम्प यांच्या प्रत्येक विधानावर लक्ष ठेऊन आहे. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या जबाबदारीला १०० दिवस पूर्ण झाले तेव्हा त्याचे पूर्ण कव्हरेज करून हा ऑनलाईन प्रोजेक्ट फॅक्ट चेकर सुरु काण्यात आला होता. त्यातून ट्रम्प यांचा थापा मारण्याचा वेग खूपच वाढला असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे.

Leave a Comment