टाटा समूहाकडून निवडणूक फंडासाठी ६०० कोटी


देशात निवडणुका जाहीर झाल्या कि निवडणूक फंडासाठी विविध औद्योगिक घराणी विविध राजकीय पक्षांना देणग्या देत असतात आणि अशी उद्योग घराणी राजकीय पक्षांच्या कमाईचे मुख्य स्त्रोत असतात. बिझिनेस स्टँडर्ड च्या रिपोर्ट नुसार टाटा समूहाने यंदाच्या २०१९ लोकसभा निवडणुका फंडासाठी विविध राजकीय पक्षांना मोठा फंड दिला असून ही रक्कम ५०० ते ६०० कोटी असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. २०१४ च्या निवडणुकात टाटा समूहाने निवडणूक निधी म्हणून २५ कोटी दिले होते त्याच्या तुलनेत ही रक्कम २० पटीने अधिक आहे.

निवडणुकीत फंड देण्यासाठी टाटा प्रोग्रेसिव इलेक्टोरल फंडची स्थापना समूहाने केली असून या ट्रस्टच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. यंदाच्या वर्षी या देणग्या खूपच वाढल्या असून त्यात सर्वाधिक देणगी भाजपला दिले गेल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. टाटा प्रोग्रेसिव इलेक्टोरल फंड मध्ये टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्या ट्रस्टला दान देतात आणि या जमा फंडातून देणग्या दिल्या जातात. बिझिनेस स्टँडर्डच्या अहवालात यंदा या ट्रस्टमधून भाजपला ३०० ते ३५० कोटी रुपये देणगी म्हणून दिले गेले असावेत तर कॉंग्रेसला ५० कोटी मिळाले असावेत. बाकी १५० ते २०० कोटी तृणमूल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, सीपीआयएम, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात विभागून दिले गेले असावेत.

नुकत्याच आलेल्या अन्य एका अहवालानुसार इलेक्टोरल बॉंड योजना आल्यामुळे यंदा लोकांनी राजकीय पक्षांना देणग्या देताना रोख रक्कम कमी प्रमाणात दिली आहे. हिंदूच्या रिपोर्टनुसार इलेक्टोरल बॉंड २०१७-१८ मध्ये जमा झालेल्या एकूण २२१ कोटी पैकी भाजपला २१० कोटी, कॉंग्रेस ला ५ कोटी तर बाकी ६ कोटी अन्य राजकीय पक्षांना मिळाले आहेत.

Leave a Comment