आपली पत्नी डॉ. प्रिसिला चान हिला शांत झोप लागावी किंवा तिची वारंवार झोपमोड होऊ नये फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी यासाठी एक खास उपकरण तयार केले आहे. आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर या उपकरणाचे एक छायाचित्र झुकेरबर्गने शेअर केले आहे.
पत्नीच्या शांत झोपेसाठी झुकेरबर्गने बनवले अनोखे उपकरण
एक लाकडी बॉक्स मार्क झुकेरबर्गने बनवला असून सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान हा बॉक्स आपोआप चमकायला लागतो. रोज सकाळी आपल्या मुलांची तयारी करुन त्यांना शाळेत पाठवण्यासाठी झुकेरबर्गची पत्नी प्रिसिला यांना उठावे लागते. त्यामुळे ती अनेकदा रात्री झोपेतून उठून वेळ किती झाली आहे ते पाहते, त्यामुळे तिची वारंवार झोपमोड होते. पण आता या ग्लोइंग वुडन बॉक्समुळे प्रिसिलाची झोपमोड होत नाही किंवा रात्रीतून तिला वारंवार उठायला लागत नाही.
पत्नीमुळे अशाप्रकारचा बॉक्स बनवण्याची कल्पना आली. ती रोज सकाळी मुलांची तयारी करण्यासाठी उठून वेळ किती झाली ते बघते, तिला वेळ कळल्यानंतर चिंतेमुळे आणि झोपमोड झाल्यामुळे पुन्हा झोप लागत नाही. त्यामुळे अशाप्रकारचे एखादे उपकरण बनवण्याची कल्पना डोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा बॉक्स सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान चमकायला लागतो, याच्या प्रकाशामुळे आता दोघांपैकी कुणीतरी उठून मुलांची तयारी करण्याची वेळ झाल्याचे आम्हाला कळते असे झुकेरबर्ग यांनी सांगितले. पण एखाद्याला त्रास व्हावा एवढ्या प्रमाणातही हा बॉक्स चमकत नसल्याचे झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले.