हेमंत करकरेंच्या बाबतीत आता सुमित्रा महाजन यांचे वादग्रस्त वक्तव्य


भोपाळ: भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळे वादात सापडल्यानंतर आता राजकीय वर्तुळात लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. महाजन यांनी करकरे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल शंका उपस्थित केली.

कर्तव्यावर असताना हेमंत करकरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांना शहीद मानले जाईल, असे महाजन म्हणाल्या. पण करकरेंच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर महाजन यांनी त्यांच्या विधानातून निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. दिग्विजय सिंह यांनी महाजन यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. अशोक चक्र विजेत्या हेमंत करकरेंसोबत सुमित्राताई, तुम्ही माझे नाव जोडत आहात, याचा मला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंह यांनी दिली.

भाजपवर काँग्रेसचे भोपाळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेल्या दिग्विजय सिंह यांनी शरसंधान साधले. सुमित्रा ताई, तुमचे साथीदार जरी करकरेंचा अपमान करत असले, तरी सदैव मी देशहित, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा पुरस्कार करणाऱ्यांसोबत राहीन. धार्मिक उन्माद पसरवणाऱ्यांच्या विरोधात मी कायम असेन. मी मुख्यमंत्री असताना सिमी आणि बजरंग दल या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. मी ते धाडस दाखवले, याचा मला अभिमान आहे. देश माझ्यासाठी सर्वात आधी येतो. घाणेरडे राजकारण करण्यात मला रस नसल्याचे म्हणत दिग्विजय सिंह यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधला.

Leave a Comment