कोलकाता – मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत २०० पेक्षा अधिक धावांचे आव्हान पेलताना लवकर बाद झाला होता. त्यामुळे नाराज रोहितने आपल्या बॅटन यष्ट्या उद्ध्वस्त केल्या म्हणून सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रकमेचा दंड त्याला ठोठावण्यात आला.
रोहित शर्माला स्टम्पवर राग काढल्याप्रकरणी दंड
मुंबई इंडियन्सपुढे इडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात २३३ धावांचे आव्हान होते. सलामीवीर रोहित ते आव्हान पेलताना हॅरी गर्नीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याला पंचांनी पायचीत दिल्यानंतर डीआरएसचा रोहितने आधार घेतला. पण तो बाद असल्याचे तिसऱ्या पंचांनीही स्पष्ट केले. तेव्हा नाराज झालेला रोहित पॅव्हेलियनकडे जाताना दुसऱ्या टोकाला असलेल्या यष्ट्यांना बॅटने ठोकरून पुढे गेला.
रोहितकडून इंडियन प्रीमियर लीगच्या आचारसंहितेतील नियमांचा भंग झाला. हा नियमभंग केल्याची कबुलीही रोहितने दिली. २.२ या नियमाचा रोहितने भंग केला. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात याआधीही षटकांची गती योग्य न राखल्याबद्दल त्याला १२ लाखांचा दंड सहन करावा लागला आहे.