नेस वाडियाला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये २ वर्षाची शिक्षा


नवी दिल्ली – अमली पदार्थांचे सेवन करणे उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे पुत्र नेस यांना चांगलेच भोवले आहे. जपान न्यायालयाने नेस वाडियाला अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पण ५ वर्षांसाठी ही शिक्षा निलंबित ठेवण्यात आली आहे. नेस याने पुढील ५ वर्षांच्या काळात जपानमध्ये गुन्हा केल्यास त्याची तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक कुटुंबांपैकी वाडिया हे एक कुटुंब आहे. वाडिया कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, की न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. ५ वर्षांसाठी नेस वाडिया यांना ठोठावलेली शिक्षा निलंबित करण्यात आली आहे. सध्या नेस वाडिया भारतात आहे. कोणताही परिणाम त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीवर होणार नसल्याचे वाडिया कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

२८३ वर्षांपासून वाडिया ग्रुप हा देशातील विविध उद्योगात आहे. किंग्ज एलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचे नेस वाडिया हे भागीदार आहेत. मार्चमध्ये त्यांना उत्तर जपानच्या हॉक्कायडो या बेटावरील न्यू चिटोस विमानतळावर अटक करण्यात आली होती. जपानमधील स्थानिक माध्यमाच्या माहितीनुसार न्यू चिटोसमध्ये प्रशिक्षित कुत्र्यांनी कस्टम अधिकाऱ्यांना वाडिया यांच्याकडील अमली पदार्थाबाबत सावध केले होते. त्यानंतर वाडिया यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ २५ ग्रॅम गांजा असल्याचे आढळून आले.

Leave a Comment