अरे देवा! माऊंट एव्हरेस्टवरून जमा केला तब्बल 3 टन कचरा


काठमांडू – 14 एप्रिलपासून नेपाळने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सफाई मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत माऊंट एव्हरेस्टवरून सुमारे तीन टन कचरा उचलण्यात आला आहे. जगातील सर्वात उंच शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्ट हे ओळखले जाते. एव्हरेस्टवरून 45 दिवसांच्या या मोहिमेंतर्गत सुमारे 10 टन कचरा उचलण्याचे लक्ष्य आहे.

14 एप्रिलला ही मोहीम सोलुखुंबु जिल्ह्यातील खुंबू पासनगलामू ग्रामीण पालिकेने सुरू केली होती. नेपाळी नववर्ष सुरू झाले त्यादिवसापासून 45 दिवस राबवली जाणारी एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम सुरू झाली. एव्हरेस्टवरून या मोहिमेंतर्गत 10 टन कचरा गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या संदर्भात पर्यटन महासंचालक दांडू राज घिमिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन टन कचरा गोळा करण्यात आला असून त्यातील दोन टन कचरा ओखालधुंगा येथे, तर एक टन कचरा काठमांडूला पाठवण्यात आला आहे. तीन टन कचरा उचलण्यात आला असून त्यामध्ये प्लास्टीक, बिअर बॉटल्स, कॉस्मेटीक कव्हरचा समावेश आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा वापर कचरा पाठवण्यासाठी करण्यात आला आहे.

बेस कॅम्पवरून पाच हजार किलो तसेच दक्षिण भागातून दोन टन तर कॅम्प 2 व 3 भागातून तीन टन गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत माऊंट एव्हरेस्टवर पडलेले मृतदेहही परत आणण्याचा समावेश आहे. सर्व लोक या मोहिमेत सहभागी आहेत. चार मृतदेह बेसकॅम्पच्या ठिकाणी सापडले असून ते खाली आणण्यात आले आहेत. 23 दशलक्ष नेपाळी रुपये एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत खर्च होणार आहेत. 500 परदेशी गिर्यारोहक व 1000 सहायक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. गिर्यारोहकांनी त्यांचा कचरा परत आणला तर ते जास्त फायदेशीर ठरेल असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment