राजस्थान मरुभूमीत सफरचंदे पिकविणारी जिद्दी संतोषदेवी


राजस्थानची भूमी मरुभूमी म्हटली जाते. चोहोबहुने वाळवंट, पाण्याची कमतरता आणि सुपीक जमिनीचा अभाव आणि टोकाचे हवामान यामुळे या जमिनीतून कुणी चांगले आणि भरपूर पैसे देणारे पिक काढेल यावर विश्वास बसणे तसे अवघड. मात्र केवळ सव्वा एकर त्याही पडीक जमिनीतून डाळिंबे आणि सफरचंदे पिकवून वर्षाला २५ लाखाची किमया केली आहे संतोषदेवी या शेतकरी महिलेने. अर्थात हे यश पाहण्यासाठी तिला आयुष्याचा मोठा काळ काबाडकष्ट करावे लागले आहेत. तिच्या या कर्तृत्वाचा सन्मान २०१६ मध्ये तिला कृषी मंत्र पुरस्कार देऊन केला गेला आहे.

सिकर जिल्ह्यातील बेरिया गावात हा शेखावती फार्म आता अनेक शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केंद्र ठरला आहे. हा फार्म म्हणजे संतोषदेवी आणि तिचा पती रामकरण यांचे कष्ट, जिद्द आणि आत्मसन्मान याची गाथा आहे. द बेटर इंडिया मधील रिपोर्ट नुसार संतोषदेवी हिचा जन्म झुन्झुनु जिल्ह्यात झाला आणि वडील पोलिसात असल्याने तिचे थोडे शिक्षण दिल्लीत झाले मात्र वडिलानी नोकरी सोडून गावी शेती करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. येथेच संतोषीने शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळविले.१५ व्या वर्षी तिचा विवाह रामकरण बरोबर झाला तसेच संतोषीच्या लहान बहिणीचा विवाह तिच्या दिराशी झाला. एकत्र परिवारात काही अडचणी आल्याने कुटुंब विभक्त झाले त्यात संतोषीच्या वाट्याला सव्वा एकर बंजर जमीन आली.


संतोषीला कुणीतरी डाळींब शेती करण्याचा सल्ला दिला, जवळ पैसा नाही म्हणून घरातली एकमेव म्हैस विकून तिने शेतात ट्यूबवेल केली, घरीच जैविक खत बनविले आणि उरलेल्या पैशात २२० रोपे आणून लावली. तीन वर्षाची अपार मेहनत, काबाड कष्ट आणि लहानपणी शेतीचे मिळालेले अपुरे ज्ञान याचा वापर करून तिने २०११ मध्ये प्रथम ३ लाख रुपये नफा मिळविला. दुसरा चमत्कार होता याच शेतात सफरचंद पिकाविण्याचा. संतोषी सांगते तिला एक सफरचंदाचे रोप भेट म्हणून मिळाले होते. ते तिने शेतात लावले पण त्याला सफरचंदे येतील अशी तिला अपेक्षा नव्हती. कारण हे पिक थंड प्रदेशात येणारे. तरीही ती या झाडाला अन्य झाडांप्रमाणे जैविक खत घालत राहिली त्याची देखभाल करत राहिली आणि काय नवल, झाड फुलांनी बहरले आणि यंदा चक्क या झाडाला ११२ सफरचंदे आली. आता संतोषीने आणखी १० सफरचंद रोपटी आणली आहेत.

संतोषी देवी आणि रामकरण यांना दोन मुली आणि मुलगा असून या तिघांनी कृषी क्षेत्रात पदवी घेतली असून घराच्या शेतीत काम करतात. हे कुटुंब वर्षाला २५ लाखाची कमाई करत असून शेतीबरोबर रोपे विक्री करण्याचे कामही ते करत आहेत. कुणीही गरजू आला तर संतोषीदेवी त्याला योग्य तो सल्ला देतात आणि शेती कामात शक्य ती मदत करतात.

Leave a Comment