न्यूयॉर्क येथील इंटरनॅशनल ऑटो शो मध्ये सादर केली गेलेली कार्लमन किंग ही जगातील सर्वाधिक महागडी एसयुव्ही ठरली आहे. वास्तविक दुबई येथे झालेल्या ऑटोशो मध्ये ही गाडी २०१७ ला प्रथम दिसली होती. त्यावेळी तिची फक्त १२ युनिट बनविली जाणार असल्याचे सांगितले गेले होते.
कार्लमन किंग ठरली जगातली महागडी एसयुव्ही
न्यूयॉर्क शोमध्ये सादर झालेल्या कार्लमन किंग एसयूव्ही साठी ग्राहकाला तब्बल १४ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे ही जगातील सर्वाधिक महागडी एसयूव्ही ठरली आहे. ही गाडी लहान मुलांचा हिरो बॅटमनच्या कारसारखी दिसते. या लक्झरी एसयूव्हीचे इंटिरियर एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील कार प्रमाणे आहे. चायनीज कंपनी आयएटीने ती डिझाईन केली असून युरोप मधील १८०० लोकांच्या टीमने ती तयार केली आहे.
या गाडीला ६.८ लिटरचे व्ही १० इंजिन असून इंटेरीअर मध्ये फ्रीज, ४० इंची अल्ट्रा एचडी ४ के टीव्ही, ऑप्शनल सॅटेलाइट टीव्ही, फोन, गेम शौकिनांसाठी पीएसजी, क्रिस्टल ग्लास सह छोटा बार, कॉफी मशीन अश्या सुविधा आहेत आणि हे सर्व स्मार्टफोन अॅपच्या सहाय्याने कंट्रोल करता येते. कारची बॉडी कार्बन फायबर आणि स्टील पासून बनविली गेली असून या एसयूव्हीचे वजन ५८०० किलो आहे. ही गाडी बुलेटप्रुफ आहे. ती फायटर लुकची असून तिच्या डायमंड कोन डिझाईनमुळे ती अधिक आकर्षक बनली आहे.