नरेंद्र मोदींच्या विरोधात मोक्याच्या क्षणी सपाने बदलला उमेदवार


वाराणसी – वाराणसीमध्ये सपा-बसपा महाआघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. वाराणसी येथील आपला उमेदवार सपा-बसपा महाआघाडीने बदलताना येथून बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आजचा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

दरम्यान, तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण तेज बहादूर हेच नरेंद्र मोदींसमोर उमेदवार असतील. तसेच आपला उमेदवारी अर्ज शालिनी यादव या मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे. काँग्रेसने या मतदारसंघात अजय राय यांना उमेदवारी दिली असल्यामुळे वाराणसीमध्ये आता नरेंद्र मोदी, अजय राय आणि तेज बहादूर असा तिरंगी मुकाबला होणार आहे.

वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर यांनी केली होती. ते सुरुवातीला अपक्ष निवडणूक लढवणार होते. पण त्यांना अखेरीस समाजवादी पक्षाने आपल्याकडून उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment