जबरदस्तीने असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी १२ वर्षांची शिक्षा!


ब्रिटनमधील एका व्यक्तीने देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत नियमांचे उल्लंघन करुन जबरदस्तीने असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी न्यायालयाने त्या व्यक्तीला दोषी ठरवत १२ वर्षांची शिक्षा सुनावल्याची घटना समोर आली आहे.

पीडितेसोबत ३५ वर्षीय हॉगबेन नावाच्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवण्याआधीच असे ठरले होते की, तो कंडोमचा वापर करेल. पण तसे त्याने न केल्यामुळे पीडितेच्या सहमतीच्या अटीचे त्याने उल्लंघन केले. ही तक्रार घेऊन २० वर्षीय पीडित तरुणी पोलिसात गेली. त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी बलात्काराच्या आरोपात त्या व्यक्तीला अटक केली.

तरुणीकडून झालेल्या आरोपांचे हॉगबेनने खंडन केले. पण ट्रायलनंतर त्याला दोषी ठरवण्यात आले. दरम्यान, पीडित तरुणी जेव्हा पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली होती, आरोपीने तेव्हा तिच्या आजी-आजोबांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर तर त्याला दोषी ठरवण्यात आल्यावर जेव्हा न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली त्यानंतर त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून न्यायाधिशांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

न्यायालयाला सुनावणीदरम्यान आढळले की, अ‍ॅडल्ट वर्कच्या वेबसाइटवर पीडित तरुणीने तिच्या सेवेची जाहिरात दिली होती. सर्व अटींचा स्पष्ट उल्लेख त्यात तिने केला होता. त्यात लिहिले होते की, ग्राहकांना सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल आणि आवश्यक वस्तूंचा वापर करावा लागेल.

आरोपीने ही जाहिरात पाहूनच व्यक्तीला संपर्क केला होता. पण शारीरिक संबंध ठेवताना आरोपीने मध्येच कंडोम काढून टाकला. पीडितेने याचा विरोध केला. पण तरी सुद्धा आरोपीने जबरदस्ती पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दोन तास तिच्यासोबत राहूनही आरोपीने तिला पैसे दिले नाहीत. याआधीही या आरोपीवर अत्याचाराचे आरोप झालेले होते. आता त्याला १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Comment