लखनौ – अमेठी मतदारसंघात निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पराभूत झाल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे पंबाज सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेता नवज्योतसिंह सिद्धू यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीवेळी रायबरेलीत माध्यमांशी बोलताना सिद्धू यांनी हे आव्हान दिले आहे.
भाजपसोबत राहिल्यास देशभक्त आणि सोबत सोडल्यास देशद्रोही – नवज्योतसिंह सिद्धू
भाजप नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर नवज्योतसिंह सिद्धू यांनी काँग्रेसचा हात हातात धरला. त्यानंतर, त्यांना पंबाजमध्ये काँग्रेस पक्षाकडून मंत्रीपदही देण्यात आले आहे. राष्ट्रवाद जर कुणाला शिकायचा असल्यास त्यांनी युपीए प्रमुख सोनिया गांधींकडून शिकावा. काँग्रेस 10 वर्षे सत्तेत सोनिया गांधी यांच्यामुळेच होती. देशात काँग्रेसने भरपूर विकास केला आहे. आपल्या देशात सुईपासून जहाजांपर्यंत सर्वकाही बनते. गेल्या 70 वर्षात काँग्रेसने काय केले, असे म्हणणाऱ्या भाजपला सिद्धू यांनी टोला लगावला. तसेच, भाजपसोबत जी व्यक्ती असते, एकनिष्ठ राहते तिला देशभक्त म्हटले जाते आणि भाजपला सोडून जी व्यक्ती जाते, त्याला देशद्रोही म्हटल्याचे म्हणत सिद्धू यांनी भाजपवर आगपाखड केली.