‘अॅव्हेंजर ऐन्डगेम’ची भारतात छप्पर फाड कमाई


मागच्या आठवड्याच्या शुक्रवारी मार्व्हल चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा ‘अॅव्हेंजर्स एन्डगेम’ हा चित्रपटगृहात दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच अनेक विक्रम या चित्रपटाने मोडीत काढल्यानंतर आता या चित्रपटाने भारतातही छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाने तीनच दिवसात जवळपास 154.5 कोटींची कमाई केली आहे. ‘बाहुबली’ चित्रपटालाही या चित्रपटाने मागे टाकले आहे.

भारतात ‘अॅव्हेंजर ऐन्डगेम’ने पहिल्याच दिवशी 53.10 कोटींचा कमाई केली होती. तब्बल 2845 स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकला. या चित्रपटावर समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटमध्ये बॉक्स ऑफिसवर ‘अॅव्हेंजर ऐन्डगेम’ कमाईच्या बाबतीत त्सुनामी लाट ठरेल, असे म्हटले आहे. या चित्रपटावर बॉलिवूड कलाकारांकडुनही चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. हा चित्रपट अक्षय कुमारने त्याच्या कुटुंबासोबत जाऊन पाहिला. तर हा चित्रपट पाहून सिद्धार्थ मल्होत्रादेखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

रॉबर्ट डाउनी जूनियर, क्रिस इवांस, मार्क रफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट जोहानसन, जेरेमी रेनर, पॉल रड आणि ब्री लार्सन यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका ‘अॅव्हेंजर्स एन्डगेम’ या चित्रपटात आहेत. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment