या अतिहुशार पोपटाला पोलिसांनी दिली कस्टडी


केवळ भारतातच नाही तर जगभरातील देशात लोक पोपट हा पक्षी पाळतात असे आढळते. पोपट शिकविलेले शिकतो त्यामुळे बोलणारे पोपट लोक हौसेने पाळतात. भारतात सर्सामान्य पणे पोपटाला राम राम, घरातल्या लोकांची नावे बोलायला शिकविले जाते आणि पोपट नावाच्या शब्दाच्या उच्चाराप्रमाणे अचूक आवाज काढतो हे आपण अनेकदा पाहतो, ऐकतो. त्यातून आमचा पोपट रामायण म्हणतो, स्तोत्रे म्हणतो अशी कौतुकेही केली जातात. पोपट हा असा पक्षी आहे जो माणसात सहज मिसळून जातो त्यामुळे पोपट पाळण्याचे प्रमाण मोठे आहे.

पोपटाच्या शिकवले ते शिकण्याच्या गुणाचा वापर ब्राझीलमधील एका जोडप्याने हुशारीने करून घेतला आणि पोपटाची ही हुशारी त्याच्यावरच बेतल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या पोपटाच्या हुशारीमुळे पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याची रवानगी टेरेसिना प्राणीसंग्रहालयात केली गेली.


झाले असे कि ज्या जोडप्याने हा पोपट पाळला होता ते ड्रग तस्कर आहेत. त्यांनी पोपटाला ममा पोलीस हे शब्द शिकविले होते आणि त्यासाठी खास प्रशिक्षण दिले होते. घराच्या बाहेरच्या पिंजऱ्यात या पोपटाचा मुक्काम होता आणि कुणीही अनोळखी व्यक्ती दिसली कि तो ममा पोलीस असा इशारा देत असे. पोलिसांना या घरात अमली पदार्थ आहेत याची माहिती कळल्यावर पोलीस छापा टाकण्यासाठी आले तेव्हा या पोपटाने ममा पोलीस, ममा पोलीस असे आवाज करून धोक्याचा इशारा दिला आणि मालकांना सावध केले. या जोडप्यातील महिला पळून गेली पण एडविनला म्हणजे या महिलेच्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडून कोकेनचे चार पाकिटे मिळाली. संबंधित महिलेला पोलिसांनी यापूर्वीही दोन वेळा याच गुन्ह्यावरून पकडले होते. पोलीस आता या महिलेच्या शोधात आहेत. पण त्यांनी मालकाबरोबर पोपटालाही अटक केली आहे.

पोपटाचा असा उपयोग प्रथमच झालेला नाही आणि दीर्घ काळापासून पोपटाचा असा उपयोग केला जात आहे. २०१० मध्ये कोलंबियात अशीच एका घटना घडली होती. तेथे अवैध शस्त्र विक्री होत असे. तेथील लोकांनी पोपट पाळून त्याला रन रन असे शब्द शिकविले होते. त्या घरावरही जेव्हा पोलिसांनी धाड टाकली तेव्हा पोपटाने रन रन ओरडून आतील गुन्हेगारांना सावध केले होते. मात्र त्या धाडीत पोलिसांनी २०० हून अधिक अवैध शस्त्रे आणि ड्रग्स मोठ्या प्रमाणावर जप्त केली होती.

Leave a Comment