शहीद करकरेंविषयी मालेगाव स्फोटातील आणखी एका आरोपीचे वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – भोपाळमधून लोकसभा उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरपाठोपाठ शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी मालेगाव बॉम्बस्फोटातील आणखी एका आरोपीने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हेमंत करकरे दहशतवाद्यांच्या हातून मारले जाणे म्हणजे हा त्यांच्या नालायकपणाचा पुरावा असल्याचे वक्तव्य निवृत्त मेजर रमेश उपाध्यायने केले आहे. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बालिया मतदार संघातून मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी उपाध्याय याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेकडून मेजर उपाध्यायने उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रज्ञा सिंह हिच्या उमेदवारीवर सहमती दर्शविली आहे.

कोणताही पोलिस अधिकारी मरण पावला तर त्याला शहीद म्हटले जात नाही. केवळ स्वातंत्र सैनिक आणि सैनिक शहीद असतात. पोलिस अधिकारी कधीही शहीद नसतो. प्रज्ञा सिंह हिला हेमंत करकरे यांनी निर्वस्त्र करून मारले होते. तसेच प्रचंड यातना आम्हा सर्वांना दिल्या होत्या असेही उपाध्यायने सांगितले. तसेच आरोपीमधील १२ पैकी ११ लोक व्यवस्थित चालू शकत नव्हते. प्रज्ञा ठाकूर व्हिलचेअरवर होत्या. त्यामुळे यावरून अंदाज येऊ शकतो, की आमच्यावर किती अत्याचार झाला, असेही उपाध्यायने सांगितले.

तत्कालीन युपीए सरकारला आरोपी उपाध्याय याने जबाबदार धरले आहे. आमच्यावर कारवाई काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, अहमद पटेल, पी. चिंदबरम, सुशील कुमार शिंदे आणि इतर नेत्यांच्या आदेशांमुळेच झाल्याचे उपाध्यायचे म्हणणे आहे.

Leave a Comment