मुंबई : शिवसेनेच्या उपनेतेपदी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
शिवसेनेच्या उपनेतेपदी प्रियंका चतुर्वेदी यांची नियुक्ती
चतुर्वेदी यांनी उपनेतेपदी निवड झाल्यानंतर ट्विट करत उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकताच काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांना शिवबंधन बांधले. त्यांच्याकडे आता उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९७९ मध्ये मुंबईत झाला. मुळचे उत्तर प्रदेशमधील प्रियंका चतुर्वेदी यांचे कुटुंब आहे. मुंबईत त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांची राजकारणाच्या पलीकडे सोशल मीडियावर ब्लॉगर म्हणून एक वेगळी ओळख आहे. विविध पुस्तकांचे समीक्षापर लेखन या ब्लॉगच्या माध्यमातून करतात. देशातील टॉप टेन ब्लॉगपैकी एक ब्लॉग प्रियंका चतुर्वेदी यांचा आहे.