नवी दिल्ली – भारतातील शेतकऱ्यांविरोधात पेप्सीको या आंतरराष्ट्रीय कंपनीने १ कोटी ५ लाखांचा दावा केला आहे. पेप्सीकोने हा दावा गुजरातमधील नऊ शेतकऱ्यांविरोधात दाखल केला आहे. या शेतकऱ्यांवर कंपनीचे लोकप्रिय प्रोडक्ट असणाऱ्या ‘लेज’च्या वेफर्स बनवण्यासाठी कंपनीने विकसित केलेल्या बटाट्यांच्या प्रजातीचे उत्पादन घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रत्येक शेतकऱ्याकडून १ कोटी ५ लाखांच्या रक्कमेची मागणी कंपनीने केली आहे. आम्ही हा दावा कंपनीची धोरणे आणि कंपनीला बटाटे पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा लक्षात घेऊन केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सीएनएन या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
भारतातील शेतकऱ्यांविरोधात ‘पेप्सीको’चा १ कोटी ५ लाखांचा दावा
आता या दाव्याविरोधात शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोहिम सुरु केली आहे. भारत सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. २६ एप्रिल रोजी अहमदाबाद कोर्टात या प्रकरणातील सुनावणी होणार आहे.
ज्या नऊ शेतकऱ्यांविरोधात १ कोटींहून अधिकचा दावा पेप्सीकोने केला आहेत ते छोटे शेतकरी असून केवळ ३ ते ४ एकर शेती त्यांच्याकडे आहे. कंपनीने या प्रकरणात दावा दाखल केल्यानंतर प्रोटेक्शन ऑफ प्लॅण्ट व्हरायटी अॅण्ड फार्मर्स राईट्स अथोरिटीकडे (पीपीव्ही अॅण्ड एफआरए) शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे. पीपीव्ही अॅण्ड एफआरएने याप्रकरणात आमच्या बाजूने लढावे आणि कायदेशीर लढाईसाठीचा खर्चही उचलावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.