बैलगाडा शर्यतबंदीचे भांडवल करून मते मागुन दिशाभुल करत आहेत विरोधक


पुणे – चाकण येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला म्हणजेच बैलगाडा शर्यत या मुद्याला हात घातला. शेतकऱ्यांसह शिवसेनेने ही बैलगाडा शर्यत बंद असताना या बंदीविरोधात मोठा लढा दिला आहे. पण, या बैलगाडा शर्यतबंदीचे भांडवल करून विरोधक मते मागुन दिशाभुल करत आहेत. ही बैलगाडा शर्यत बंदी पुढील काळात सरकारच्या माध्यमातून मीच उठवणार, असे म्हणाले आहेत.

सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा खासदार जनतेला निवडणुकीच्या रिंगणात मतांचे राजकारण सुरू असताना हवा असतो. पण, सिनेमा, नाटक किंवा मालिकेत काम करणारा हाच खासदार असेल, तर जनतेचे प्रश्न तो कसा सोडवणार, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसला या सभेत उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य करत शिरूर लोकसभेमध्ये आमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. तर, दुसरीकडे यांच्याजवळ पंतप्रधानपदासाठी उमेदवारच नसल्यामुळे मते कुणाच्या नावावर मागता, असे खडे बोलही त्यांनी लगावले.

त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही निशाणा साधला. भगव्याची निष्ठा मालिकेच्या माध्यमातून शिकवली जाते. मग स्वतः जवळची निष्ठा कुठे जाते, असा टोला त्यांनी लगावला. युतीच्या सरकारने आपल्या देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक केले. आपल्या जवानांचे शौर्य हे यामध्ये महत्त्वाचे होते. आता याच सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, जवानांच्या शौर्यावर शंका उपस्थित करताना तुम्हाला लाज तरी का वाटत नाही? असेही ते म्हणाले.

Leave a Comment