नवी दिल्ली : पुढील एप्रिल महिन्यापासून डिझेल कार निर्मिती आणि विक्रीवर बंदी आणणार असल्याचे देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती इंडियाने सांगितले आहे. या कंपनीकडून सध्या डिझेलच्या कित्येक मॉडेल्सची विक्री आणि निर्मिती होत आहे.जवळपास 23 टक्के डिझेल वाहनांची विक्री भारतात या एकट्या कंपनीकडून होते.
डिझेल कारची निर्मिती आणि विक्री बंद करणार मारुती इंडिया
प्रदूषणविषयक ‘बीएस-6’ नियमावली एप्रिल 2020 पासून लागू होत असल्याने हा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनी पुढील वर्षी एप्रिलपासून डिझेल वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवेल. नवीन प्रदूषणविषयक कठोर नियमावलीचे पालन करायचे झाल्यास डिझेल वाहनाचा उत्पादन खर्च लक्षणीय वाढेल आणि ग्राहकांसाठी हा व्यवहार्य पर्याय ठरणार नाही, असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले आहे.
देशामध्ये मारुती सुझुकीचे प्रवासी वाहनविक्रीत असलेले अनेक मॉडेल्स डिझेल इंधनावर चालणारे आहेत. पेट्रोलच्या तुलनेत यांचे डिझेलचे मॉडेल महाग असले तरी, इंधन किमती परवडत असल्याने डिझेल कारला खरेदीदारांची पसंती असते. डिझेल इंजिनाला BS-VI नियमावलीच्या अंतर्गत अपग्रेड करण्यासाठी खूप जास्त खर्च येणार आहे. यामुळे मॉडल्सच्या किमतीत वाढ करणे आवश्यक आहे. किंमत वाढविल्याने विक्रीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे कंपनीने डिझेल इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.