मुस्लीम समाजाची माफी मागितली तरच साध्वी प्रज्ञा सिंह यांचा प्रचार करू


भोपाळ – आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या चर्चेत आहेत. मुस्लीम समाजाची साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली तरच त्यांचा प्रचार करू असे एका भाजप नेत्यानी म्हटले आहे. भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी नकार दिला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमविरोधी वक्तव्यांसाठी माफी मागितली तरच त्यांचा प्रचार करण्यास मी तयार असल्याचे सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा यांच्यासाठी मी प्रचार करणार नाही, धर्मयुद्धासंदर्भात त्यांनी विधान केले होते. त्यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भातही वादग्रस्त विधान केले होते, असे फातिमा यांनी म्हटले आहे. विकासाच्या मुद्द्यावर प्रज्ञा यांनी प्रचार केला पाहिजे होता, असेही फातिमा यांनी यावेळी सुनावले आहे. मध्य प्रदेशचे माजी मंत्री मरहूम रसूल अहमद सिद्दीकी यांच्या फातिमा या कन्या आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. पण साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीला फातिमा यांनी विरोध दर्शवला आहे.

Leave a Comment