समुद्रात हरविलेले अॅपल वॉच सहा महिन्यानंतर सापडले


समुद्रात एखादी वस्तू हरवली तर ती परत मिळेल अशी खात्री कुणी देऊ शकेल असे वाटत नाही. अर्थात समुद्र त्याच्या पोटात काहीच ठेऊन घेत नाही आणि समुद्राच्या लाटा समुद्राच्या पोटातील वस्तू किनाऱ्यावर अलगद आणून टाकतात हेही अनेकदा ऐकायला मिळते. पण समजा हरविलेली वस्तू घड्याळ असेल तर ती परत मिळेल का आणि समजा दीर्घकाळाने मिळाली तर ते घड्याळ सुरु असेल का याचे उत्तर नक्कीच नाही असे आहे. नवलाची गोष्ट अशी कि अॅपलच्या स्मार्टवॉच ने समुद्रात ६ महिने राहून सुद्धा सुरु राहण्याची किमया केली आहे.


गोष्ट आहे कॅलिफोर्नियातील. येथे राहणारे रॉबर्ट बेन्टर सर्फर आहेत. ते नियमाने पॅसिफिफ समुद्रात कॅलिफोर्नियाच्या हंटिंगटन किनाऱ्यावर सर्फिंग साठी जातात. सर्फिंग करताना ते नेहमी अॅपल वॉच घालत असत. त्यामुळे त्यांना ते समुद्रात नक्की कुठे आहेत, त्यांचा वेग आणि वेळ कळत असे. एकदा असेच सर्फिंग करत असताना मोठी लाट आली. त्यातून रोबर्ट बाहेर आले तेव्हा त्यांना दिसले कि त्यांचे अॅपल वॉच मनगटावर नाही. त्यांना खूपच वाईट वाटले. त्यांनी एक तास जीपीएस ट्रॅकींग करून घड्याळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. घड्याळ हरविले त्याला सहा महिने होत आले. मात्र तरीही रोबर्ट बीचवर गेले कि वाळूत कुठे घड्याळ दिसते का याचा शोध घेत राहिले. त्यासाठी ते अॅपलच्या फाईंड माय फोन अॅपचा वापर करत असत. पण काही उपयोग नाही असे लक्षात आले तेव्हा त्यांनी दुसरे अॅपल वॉच खरेदी केले.


सहा महिन्यानंतर मात्र एक दिवस त्यांना अचानक एक फोन आला. त्या व्यक्तीने रोबर्ट यांना तुमचे अॅपल वॉच मला मिळाले आहे असे सांगितले. रोबर्टने केटीएलए ५ टीव्हीवर एकदा मुलाखत देताना त्यांचे अॅपल वॉच सर्फिंग करताना समुद्रात पडल्याचे आणि ते घड्याळ त्यांच्यासाठी गुड लक चार्म असल्याचे सांगितले होते. ज्या व्यक्तीने रोबर्टला फोन करून घड्याळ सापडल्याचे सांगितले ते ठिकाण त्यांचे घड्याळ जेथे हरविले होते तेथून ५ किमी दूर होते. ही व्यक्ती समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्यांना वाळूत पडलेले हे घड्याळ दिसले होते. विशेष म्हणजे पाण्यात राहूनही हे घड्याळ काम करत होते. खाऱ्या पाण्यामुळे त्याचा स्क्रीन थोडा धुरकट झाला होता. अर्थात रोबर्ट यांचा आनंद गगनात मावेना यात नवल काय?

आता प्रश्न उरतो ते हे घड्याळ इतके दिवस समुद्राच्या पाण्यात राहूनही सुरु कसे राहिले? त्याचे उत्तर असे की अॅपल वॉच मध्ये वॉटर लॉक मोड दिला गेला आहे. त्यामुळे घड्याळ पाण्याच्या संपर्कात आले, तर सारे पोर्टस आपोआप सील होऊन जातात. त्यानंतर जो पर्यंत स्क्रीन स्क्रोल केला जात नाही तोपर्यंत हा मोड डिसेबल होत नाही. त्यामुळे इतके दिवस पाण्यात राहूनही रोबर्ट यांचे घड्याळ व्यवस्थित काम करत होते.

Leave a Comment